
महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाची धडक
कुडाळ (सिंधुदुर्ग) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तेर्सेबांबर्डे बोंद्रेवाडी येथील आनंद सुरेश फुकेरकर (वय ४८) जागीच ठार झाले. अपघात शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर घडला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी
फुकेरकर पत्नी व मुलांसह मुंबई येथे राहतात. ते खासगी वाहनावर चालक होते. ते आपल्या तेर्सेबांबर्डेतील गावी आले होते. ते दुचाकीने एका ठिकाणी जात असताना अज्ञात वाहनाने धडक
देऊन पलायन केले. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी अन्य वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत त्यांना कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात दुचाकीचे बरेच नुकसान झाले आहे. दुचाकीची अवस्था पाहता अज्ञात वाहनाने समोरील बाजूने धडक दिल्याचे दिसते. घटनेनंतर संबंधित चालक गोव्याच्या दिशेने पळून गेला आहे. टायरींच्या उमटलेल्या चिन्हांनुसार, मोटारीने धडक दिली असावी, असा अंदाजही आहे. अपघातानंतर दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्याने या अपघाताची भीषणता लक्षात येते. पोलिस निरीक्षक शंकर कोरे, उपनिरीक्षक संदीप ढोबळे, पोलिस श्रीरंग टाकेकर, रामदास जाधव यांनी पंचनामा केला.
हेही वाचा- कासव संवर्धन; किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे -
घटनास्थळानजीक बॅंक ऑफ इंडियाचा सीसीटीव्ही होता; मात्र घटनास्थळापासून कॅमेरा बऱ्याच अंतरावर असल्याने अपघात या कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही. मात्र, आता काही अंतरावर असलेल्या झाराप पत्रादेवी झीरो पॉइंट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने फुकेरकर यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबतची फिर्याद कुडाळ पोलिस ठाण्यात गुरुनाथ गोविंद गावडे यांनी दिली. फुकेरकर यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
संपादन- अर्चना बनगे