esakal | Kokan: आचरा-मालवण रस्त्यावर भीषण अपघात, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

आचरा-मालवण रस्त्यावर भीषण अपघात, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आचरा: आचरा मालवण रस्त्यावर आचरा हायस्कूलनजिक काल रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने चालत जाणाऱ्या तिघांना उडविल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतात पोलिस उपनिरीक्षक दीपक लोणे, जमेंदर प्रसाद यांचा समावेश आहे. अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवली जानवली येथील कृष्णा राणे (वय-६०) यांच्या विरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अपघातातील गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा: तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'

सुट्टीवर आलेले लोणे हे रात्री सव्वा दहाच्या सुमारास आचरा तिठा येथून जेवण आटोपून आपली मुलगी परी व मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या सह पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव गाडीने तिघांनाही जोरदार धडक दिली. अपघाताची खबर समजताच गौरव पेडणेकर, विलास आचरेकर, दीपक आचरेकर, निलेश राणे, विक्रांत राणे, आचरेकर, साजित नायर, छोटू पांगे आदींनी धाव घेत जखमींना गौरव पेडणेकर यांच्या रिक्षेने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.

यात पोलीस उप निरीक्षक दीपक पुरुषोत्तम लोणे यांच्या डोक्याला, कंबरेला गंभीर दुखापत झाली, मठाचे आचारी जमेंदर प्रसाद यांच्या डोक्याला व डाव्या पायाला तर लोणे यांची मुलगी परी दीपक लोणे हिच्या डाव्या हाताच्या कोपराला व पोटाला दुखापत झाली. गंभीर दुखापतीमुळे तिघांनाही अधिक उपचारासाठी रात्री कणकवली येथे हलविण्यात आले होते. मात्र यात दीपक लोणे (वय-५७) व जमेंदर प्रसाद(वय-५०) यांचा मृत्यू झाला. तर परी लोणे (वय-१६) गंभीर जखमी आहे. याबाबत आचरा पोलीस ठाण्यात स्टेशनला भरधाव वेगाने गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गाडी चालक कृष्णा राणे याला आचरा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेली गाडी ताब्यात घेतली आहे.

स्वामी भक्त म्हणून प्रसिद्ध असलेले दिपक लोणे हे ठाणे डहाणू पालघर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल बाजूला २००८ मध्ये स्वामी समर्थ मठ स्थापन करून येथे हजारो लोकांना चहा, नाष्टा व दोनवेळच्या जेवणाची अविरत मोफत सोय केली होती. २०१७पासून आचरा वरचीवाडी येथेही भगवंत गड रस्त्यालगत शिक्षक काँलनी येथे स्वामी समर्थ मठ स्थापून अन्न दानाचे पवित्र कार्य सुरू केले होते. या मठाच्या माध्यमातून लोणे यांच्या सहकार्याने कोरोना काळात येथील स्वामी भक्तांच्या सहकार्याने हजारो लोकांना मोफत धान्य वाटप केले जात होते.

हेही वाचा: इंदापूर: गुलाब पुष्प व मास्क देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

तसेच मठामार्फत शितशवपेटीही उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचाही फायदा गरजूंना होत होता. मुणगे येथील कातकरी समाजालाही लोणे यांनी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली होती. त्यामुळे अशा समाजाभिमुख कामामुळे दीपक लोणे यांची स्वामी भक्त म्हणून आचरा परीसरात ख्याती होती. ते अधूनमधून आचरा शिक्षक कॉलनी येथील मठात रजेच्या कालावधी येत असत. कालही ते सुट्टीच्या कालावधीत आले असताना जेवण करून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ असा परीवार आहे. तर जमेंदर प्रसाद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, बहिण असा परीवार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्स्टेबल महेश देसाई करत आहेत.

loading image
go to top