सासऱ्याच्या कार्याला जातो म्हणून सांगून गेला ; तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

११ नोव्हेंबरला सासऱ्यांच्या कार्याला जातो, म्हणून सांगून घरातून बाहेर गेला तो आढळून आला नाही.

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड-तुळशी मार्गावर एका अवघड वळणावर दुचाकी रस्त्याच्या खाली दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेश सहदेव मुकनाक (वय २६, रा. दहींबे आदिवासीवाडी) असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात तीन दिवसांपूर्वी घडला असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली.

वडील सहदेव गणपत मुकनाक यांनी यासंदर्भात मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ११ नोव्हेंबरला सासऱ्यांच्या कार्याला जातो, म्हणून सांगून घरातून बाहेर गेला तो आढळून आला नाही. मात्र, त्यांचा संपर्क होत नसल्याने आई-वडील यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पायी शोध घेत चालत जात असताना आईच्या नजरेस लाल रंगाचा शर्ट पडला. आपल्या मुलाच्या शर्टाचा रंगही लाल असल्याने पुढे जावून पाहिले असता त्याठिकाणी गवतात कोसळलेली दुचाकी व आपल्या मुलाचे मृतावस्थेतील शरीर दिसले.

हेही वाचा - चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

सदर घटनेची माहिती त्वरित मंडणगड पोलिसांना कळविली. पोलिस उपनिरीक्षक सुशांत वराळे, पोलिस नाईक अमर मोरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरीचा उतार तीव्र असल्याने पोलिसांना पंचनामा करताना अडचण निर्माण होत होती. उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास मंडणगड पोलिस करीत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व दीड वर्षांची मुलगी आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of one two wheeler person in mandangad his dead body found after three days ratnagiri