पुलावरून चढ चढताना गाडी अचानक रस्त्यावर उलटली अन्..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. मागे मागे येत ती रस्त्यावर उलटली.

पावस (रत्नागिरी) :  विजयदुर्गहून मुंबईकडे निघालेल्या साई तन्मय या खासगी प्रवासी बसला बुधवारी (ता. २०) सायंकाळी पावस-गोळप पुलावर अपघात झाला. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी सर्वजण मुंबईतील असल्याचे समजते.

साई तन्मय ही खासगी प्रवासी बस (MH-०४-HS-५४९५) बुधवारी विजयदुर्ग येथून पावसमार्गे मुंबईकडे निघाली होती. या गाडीत ३६ प्रवासी होते. ही गाडी गोळप पुलावरून चढ चढत असताना गोळप घाटीत अचानक मागे आली. चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. मागे मागे येत ती रस्त्यावर उलटली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले. गाडी उलटल्याचा आवाज आल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हेही वाचा - शिवसेनेचा कोकणातील कारभार भकास ; कोकणवासींयाची नाराजी कायम  

या घटनेत बसमधील सात जणांना दुखापत झाली, पैकी एकाच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. उर्वरित सहा जणांना किरकोळ इजा झाली. त्या सगळ्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ही घटना कळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी गर्दी केली. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश गावित व देऊसकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्‍यात आणली. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident of private bus in pavas 7 people injured in ratnagiri