
भरधाव वेगाने उतारावरून आलेल्या ट्रकने एका मोटारीसह तीन दुचाकींना चिरडले.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा बाजारपेठ येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर भरधाव वेगाने उतारावरून आलेल्या ट्रकने एका मोटारीसह तीन दुचाकींना चिरडले. यात इचलकरंजी येथील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत.
सतीश कोंडिबा डांगरे (वय ४५, रा. गणेशनगर, ता. इचलकरंजी, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ कोंडिबा डांगरे (४०), शुभांगी सोमनाथ डांगरे (३८, सर्व रा. गणेशनगर, ता. इचलकरंजी, कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले. जयश्री सतीश डांगरे (४०), ऋतुजा सतीश डांगरे (१५), अर्पिता सोमनाथ डांगरे (१६, सर्व रा. गणेशनगर, इचलकरंजी, कोल्हापूर), बाळकृष्ण दत्तात्रय पटवर्धन (वय ७२, रा. कासावेली, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
तीन दुचाकींवरील सर्व इचलकरंजीहून फिरण्यासाठी गणपतीपुळेकडे जात असताना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक अजीउल्ला असमोहम्मद (रा. लेडवा, श्रीपाल पसाई, संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) हे ट्रक घेऊन (एमएच-०८-डब्ल्यू-३९४५) कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत होते. हातखंबा बाजारपेठेजवळ त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना चिरडले. या अपघातामुळे गोंधळ उडाला.
हेही वाचा - कापडाचे दर घसरले; यंत्रमाग लघुउद्योग दुहेरी कात्रीत -
अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता; मात्र त्याला ग्रामस्थांनी अडवले. ट्रकच्या धडकेत मोटारीचे (एमएच-०१-एइ-३३४) चालक बाळकृष्ण पटवर्धन जखमी झाले. तसेच इचलकरंजीहून गणपतीपुळेत फिरायला चाललेल्या तीन दुचाकींनाही ट्रकची धडक बसली. त्यात सतीश डांगरेंच्या दुचाकीचे (एमएच-०९-डीसी-७३९२), सोमनाथ डांगरेंच्या दुचाकीचे (एमएच-०९-इइ-२६९७) आणि श्रीसेल रामू डांगरे यांच्या (एमएच-०९-एफजी- ५८४३) दुचाकीचे नुकसान झाले.
या अपघातातील दुचाकीस्वारांसह जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सतीश डांगरे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. व्ही. पाटील, उपनिरीक्षक श्री. नाटेकर यांच्यासह श्री. मोहिते, श्री. भातडे, श्री. सावंत, पोलिस नाईक श्री. वरवडकर, श्री. जाधव आणि शिंदे हे घटनास्थळी धावले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
संपादन - स्नेहल कदम