टेम्पोत फरशा भरताना कोसळल्या हमालांच्या अंगावर अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

हा प्रकार  मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये सुरज सुधाकर सोलकर (वय 21,  रा. केळ्ये) व अन्य एक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तींकडून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

रत्नागिरी - शहराजवळील उद्यमनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या महिला रुग्णालयाच्या इमारतीमधील मोठ्या आकाराच्या कडाप्पा फरशी दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होत्या. त्या टेम्पोत भरताना काही या फरश्या हमालांच्या अंगावर पडून दुर्घटना झाली. त्यात चार पैकी दोन हमालांचा मृत्यू झाला तर दोन हमाल गंभीर जखमी झाले आहेत.

हा प्रकार  मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये सुरज सुधाकर सोलकर (वय 21,  रा. केळ्ये) व अन्य एक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार व्यक्तींकडून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

टेम्पोत भरत असताना दुर्घटना

उद्यमनगर येथे 100 खाटांच्या महिला रुग्णालयाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. शहरातीलच एका नामांकित ठेकेदाराला हे काम दिले आहे. त्यापैकी एका ठेकेदाराने महिला रुग्णालयाच्या कामावरील असलेलले  मोठे कडाप्पे टेम्पोत भरून दुसऱ्या साइटवर देण्यासाठी गाडी पाठवली होती. मंगळवारी रात्री टेम्पो चालक चार हमाल घेऊन कडाप्पे भरण्यासाठी महिला रूग्णालयाच्या साइटवर आले होते.  एका हॅलोजनच्या प्रकाशात हे काम सुरु होते. एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत टेम्पो उभा करण्यात आला होता. झुकलेल्या बाजूला कडाप्पे भरल्यानंतर उर्वरित कडाप्पे दुसऱ्या बाजूला भरण्याचे काम सुरू होते. गाडीत कडाप्पे भरताना अचानक एका बाजूचे कडाप्पे हमालांच्या अंगावर कोसळले. यामध्ये सुरज सुधाकर सोलकर व अन्य कर्नाटक येथील हमालाचा टेम्पोतच मृत्यू झाला. तर संतोष कांबळे,  सुभाषचंद्र नाईक हे दोन हमाल गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - महाविकास आघाडीला कशामुळे लागला रत्नागिरीत ब्रेक ? 

फरशा कोसळल्याच कशा ?

चौघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोन हमालांचा मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकारी केली. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच येथील शेकडो ग्रामस्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. कडप्पा भरण्यासाठी टेम्पो चालकाने टेम्पो निसरड्या स्थितीत लावला होता. त्यामुळे कडप्पे दुसऱ्या बाजूला कोसळले. गाडी उभी असताना कडप्पे कोसळले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा - भाजपने राखला सिंधुदुर्गातील हा गड 

संबंधीतावर कारवाईची मागणी

टेम्पो दुर्घटनेत दोन हमालांचा मृत्यू झाल्यानंतरही ठेकेदार ग्रुप कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही अधिकार्‍याने रात्री अकरा वाजेपर्यंत घटनास्थळासह जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले होते. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यासह दोघा मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मध्यरात्री शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर पंचनामा करण्याचे काम सुरू केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidentally Kadappa Style Fall On Labors Two Dead In Ratnagiri