एलईडी मासेमारी विरूद्धचा कायदा होणार कडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत व १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर अवैधरीत्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी कडक कायदा अमलात आणावा, यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयात भेट घेत लक्ष वेधले.

यावेळी अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या एलईडी बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी एलईडी मासेमारी विरोधातील कायद्यात बदल करण्याबाबत चर्चा झाली. यावर अनुपकुमार यांनी एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली.

एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय धोक्‍यात आला आहे. मासळीची बेसुमार लूट होत असल्याने वैभव नाईक यांनी एलईडी मासेमारीवर कडक कायदा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मच्छीमारांना दिले. या पार्श्‍वभूमीवर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत एलईडी मासेमारी प्रश्नाकडे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, सचिव अनुपकुमार यांचे लक्ष वेधले.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीबरोबरच १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर मासेमारी करणाऱ्या एलईडी मासेमारीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीने कडक कायदा करण्याची मागणी आमदार नाईक यांनी या वेळी केली. 

त्याचबरोबर कारवाईदरम्यान पकडलेल्या बोटी जप्त करून त्या नष्ट करण्यासाठी कायद्यात बदल करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव अनुपकुमार यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या एलईडी मासेमारीवर कडक कारवाईसाठी केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून कडक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी लवकरच हायस्पीड गस्तीनौका दिली जाईल, असे स्पष्ट केल्याची माहितीही नाईक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Act against LED fishing will be stringent