esakal | सिंधुदुर्गात प्रथमच दोघांवर मोकांतर्गत कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

0

या दोघांवर  एका टेम्पोचालकावर लुबाडण्याच्या हेतूने हल्ल्या केल्याचा आरोप आहे. त्यात त्या टेम्पोचालकाचा मृत्यू झाला होता.

सिंधुदुर्गात प्रथमच दोघांवर मोकांतर्गत कारवाई

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी येथे टेम्पोचालकावर लुटण्याच्या हेतूने चाकू हल्ला करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चंदन ऊर्फ सनी अनंत आडेलकर (वय 27) आणि अक्षय अजय भिके (27) वर सिंधुदुर्ग पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात मोक्का अंतर्गत पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. 
जिल्ह्यात यापुढे संघटीत गुन्हे करण्याचे धाडस कुणी करु नये, यासाठी कडक पावले उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. 

दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत होते. मोक्का लागल्यानंतर त्यांची रवानगी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आज पुन्हा पोलिस कोठडीत केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी काम पाहिले. 

अजय कुमार श्रीपादराव पाटील (वय 40 रा. हलोंडी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) टेम्पो (एम एच 09 ए एम 8582) घेवून 12 डिसेंबर 2020 ला पहाटे साडेचारच्या दरम्यान सावंतवाडी गवळी तिठा येथे आले होते. तेथे दोन अनोळखींनी त्यांचा टेम्पो अडवुन त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पाटील यांनी त्यांना विरोध केला असता दोघांनी पाटील यांच्या पोटावर, गळ्यावर चाकूने वार करून गंभीर दुखापती केल्या होत्या. मोबाईल हॅंडसेट चोरून नेला होता. 

पाटील यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अधीक्षक दाभाडे, अप्पर अधीक्षक तुषार पाटील यांनी जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाचे सुनील धनावडे यांना विशेष तपास पथकाव्दारे तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने 24 तासात चंदन ऊर्फ सनी अनंत आडेलकर (वय 27 रा. माजगाव ता. सावंतवाडी, मूळ रा. बारदेश म्हापसा गोवा) तसेच अक्षय अजय भिके (वय 27 रा. माजगाव ता. सावंतवाडी, मूळ रा. बारदेश म्हापसा गोवा) कडून मोबाईल हॅंडसेट, त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकीसह अन्य साहित्य जप्त केले होते. 

फिर्यादी श्रीपाद पाटील यांना गंभीर दुखापत झाली होती. गोवा-बांबुळी येथे उपचार असताना त्यांचा 16 डिसेंबरला 2020 ला मृत्यू झाला. या दोघांविरोधात गोव्यात खून, बलात्कार, फसवणूक, चोरी, विनयभंग, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमीवरून ते सराईत व संघटित टोळी करून वारंवार गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या दोघांवरही मोक्का कायद्यानुसार गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलीस उपमहानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई संजय मोहिते यांच्याकडे मागितली होती. त्यांनी तशी परवानगी दिली असून या गुन्ह्याचा तपास सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंकी या वरिष्ठ महिला अधिकारी करत आहेत. 

पहिलाच गुन्हा दाखल 
जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई होणारी ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांची माहिती संकलित करून अशा संघटीत गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे सातत्य यापुढेही ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने गुन्हेगारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड व त्यांची नावे याची यादी बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी दिली. 

संपादन : विजय वेदपाठक

loading image