हर्णे परिसरातील बर्फ उत्पादन करणाऱ्या पाच फॅक्टरीवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

एक नजर

  • हर्णे परिसरातील बर्फ उत्पादन करणाऱ्या फॅक्‍टऱ्यांची 15 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. 
  • पाच फॅक्‍टऱ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे आढळले.
  • परवाना घेईपर्यंत बर्फ उत्पादन बंद करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त इम्रान हाश्‍मी याचे आदेश. 
  • टाळसुरे येथील महालक्ष्मी आईस फॅक्‍टरी, सालदुरे येथील भवानी आईस फॅक्‍टरी (दोन युनिट), आसूद येथील ऑक्‍सीमस आईस ऍण्ड सी फूडस प्रा. लिमीटेड, (2 युनिट) या फॅक्टरींचा समावेश.

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील हर्णे परिसरातील बर्फ उत्पादन करणाऱ्या फॅक्‍टऱ्यांची 15 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत पाच फॅक्‍टऱ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे आढळले. यामुळे तो परवाना घेईपर्यंत बर्फ उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त इम्रान हाश्‍मी यांनी दिले. 

हर्णे बंदरात बर्फ विकणाऱ्या तसेच बर्फ गोळे तयार करून विकणाऱ्या गाड्‌यांमधील बर्फाची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. यात बर्फ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले पाणी अशुद्‌ध असल्याने आढळले. हा एक टन बर्फ जप्त करून तो नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

हर्णे व पाजपंढरी येथे मोठया प्रमाणात तापाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग हादरून गेला. हा ताप दूषित पाणी तसेच दूषित बर्फ गोळे खाल्याने झाला असावा असा अंदाज  आरोग्य विभागाने व्यक्त केला. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने बर्फाची तपासणी करावी, असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले.  तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हर्णे पाजपंढरी परिसरातील सर्व बर्फ फॅक्‍टरींची तपासणी करावी, असे आदेश दिले होते.

या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त इम्रान हाश्‍मी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे यांनी हर्णे परिसरातील पाच बर्फ तयार करणाऱ्या फॅक्‍टरींना भेट देऊन बर्फाचे नमुने घेतले. या 5 फॅक्‍टरी मालकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेतला नसल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले.  त्यामुळे हा परवाना घेईपर्यंत या पाचही बर्फ फॅक्‍टरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.  यामध्ये टाळसुरे येथील महालक्ष्मी आईस फॅक्‍टरी, सालदुरे येथील भवानी आईस फॅक्‍टरी (दोन युनिट), आसूद येथील ऑक्‍सीमस आईस ऍण्ड सी फूडस प्रा. लिमीटेड, (2 युनिट) यांचा समावेश आहे. 

हर्णे बंदरात मच्छिमारांना बर्फ पुरविणाऱ्या यश आइस सप्लायर्स या डेपोत जाऊन तेथील बर्फाचीही तपासणी केली असता तो दूषित पाण्यापासून तयार करण्यात आल्याचे आढळून आल्याने हा बर्फ जप्त करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली तर तीन बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्‌यांवरील बर्फाची तपासणी केली असता तोही बर्फ दूषित पाण्यापासून तयार करण्यात आल्याचे आढळून आल्याने या गाड्‌यांवर वापरण्यात येत असलेला बर्फ जप्त करून त्याचीही विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त इम्रान हाश्‍मी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on five factories producing ice in the Harne area