esakal | सावधान! जादा दराने खत विकल्यास होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! जादा दराने खत विकल्यास होणार कारवाई

सावधान! जादा दराने खत विकल्यास होणार कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer)गोणीवरील छापील किमतीपेक्षा कुणी जास्त किमतीने खत विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सावंतवाडी (Savantwadi)तालुक्‍यातील कृषी सेवा केंद्राना मुळ रक्कमेनुसारच खतविक्री करण्याच्या सक्त सूचना दिल्याचे सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी माधुरी मुटके (Agriculture Officer Madhuri Mutke)यांनी सांगितले.(Action-for-Chemical-fertilizer-excess-rate-sindhudurg-kokan-news)

छपाई किमतीपेक्षा जादा किंमत आकारता येत नाही. रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते (जुने दर छपाई असलेल्या बॅगा) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. कुणी विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्याकडे तक्रार करू शकता किंवा आपल्याकडे तक्रार करावी, असे श्रीमती मुटके म्हणाल्या.

हेही वाचा- शिरोळ तालुक्यात मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्‍यात सम्राट खताची मोठी मागणी आहे; परंतु या खताच्या गोणीवर छापील किंमत १२०० रुपये असून विक्रेत्यांकडून २००० रुपयांप्रमाणे विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आपल्याकडे केल्या आहेत. सर्वसामान्य शेतकरी लॉकडाऊनमध्ये मेटाकुटीस आला आणि असे जर खताचे भाव गगनाला भिडले तर शेतकऱ्यांनी शेती करायची की घरी बसायचे ? त्यामुळे सावंतवाडी तालुक्‍यात अशा कृषी सेवा केंद्रात जास्त दराने खत विक्री करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी पॉस मशीन किंवा दुकानदारांची छापील पावती घेणे आवश्‍यक आहे. गोणीवरील किंमत व विक्री केलेल्या रक्कमेत तफावत दिसल्यास शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम देण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील असेही गवंडे यांनी सांगीतले.