बेकायदेशीर मासेमारी करणार्‍यांवर कारवाई

महेंद्र दुसार
सोमवार, 6 मे 2019

अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या कारवाईत तपासलेल्या एकूण 18 नौकांपैकी 12 नौकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रविवारी (ता. 5) सायंकाळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या हरहर महादेव या गस्तीनैकेतून मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने भर समुद्रातच ही कारवाई केली. या कारवाईत दोनशे व्हॅट एलईडीचे 13 पॅनल, दोन हजार व्हॅटचे 4 बल्ब, पाण्यात सोडले जाणारे 3 एलईडी सिलेंडर, 1 जनरेटर, 3 स्वीच पॅनल जप्त करण्यात आले आहेत. तर 8 पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणार्‍या नौका तपासून त्यांची जाळी ताब्यात घेण्यात आली. या सर्वांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 नुसार कारवाई होणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस अधीक्षक अनील पारस्कर यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय विभागाने ही कारवाई केली. या पथकामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधीकारी स्वप्नील दामणी आणि इतर कर्मचारी सहभागी होते. 

एलईडी दिव्याच्या प्रकाशाला आकर्षित होवून येणारे मासे सरसकट पकडले जातात. यामध्ये लहान आकाराचे मासे देखील पकडले जात असल्याने मासळीचा तुटवडा भासत असतो. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने एलईडी दिव्यांद्वारे केल्या जाणार्‍या मासेमारीस बंदी घातली आहे. तरीही या बंदीचे उल्लंघन करुन रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येणार्‍या मांडवा आणि मुंबई बंदराच्या परिसरात खुलेआम मासेमारी सुरू होती. आजच्या कारवाईने बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना चांगलाच चाप बसणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action on illegal fishing at Alibaug