रत्नागिरीत अनधिकृत बांधकामावर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

रत्नागिरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

रत्नागिरी ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील मारुती आळीमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा हाणला. दहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य बाजारपेठेत पाणी भरल्याने पालिकेवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र बाजारपेठेत मुख्य गटारांवर व्यापाऱ्यांनी पक्की बांधकामे केल्याने गटारांच्या साफसफाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा अन्य कोणकोणत्या अनधिकृत बांधकामावर पालिका कारवाई करणार याकडे लक्ष लागुन राहिले आहे.

शहरातील मारुती आळीमध्ये झालेल्या या अनधिकृत पक्क्या बांधकामाबाबत काही नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि आरोग्य सभापती निमेश नायर यांनी या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाईचे आदेश दिले. मारूती आळीतील एका व्यापाऱ्यांनी गटारांवरच पक्के बांधकाम केले होते. तसेच वाटेतच अनधिकृत बोरवेल मारल्याचे निदर्शनास आले. सभापती निमेश नायर यांच्या पुढाकाराने कारवाई झाली. आज दुपारी जेसीबी नेऊन सभापती, नगरसेवक राजु तोडणकर, अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने अनधिकृत बांधकाम ठिकाणी जाऊन ते जेसीबीने जमिनदोस्त केले. यावेळी काहीसे तणावाचे वातावरण होते. कारण व्यापाऱ्यांनी पालिकेला न जुमानता हे बांधकाम केले होते. कारवाईवेळी विरोधासाठी कोणी पुढे आले नाही.त्यामुळे कारवाई सहज झाली.

हेही वाचा: परमबीर सिंग महाराष्ट्रात दाखल; सरकार करणार कारवाई

व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली राम आळी, मारूती आळी, गोखले नाका, धनजी नाका आदी ठिकाणी हिच परिस्थिती आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व्यापाऱ्यांची दाणादाण उडवून दिली. बाजारपेठेत पाणी भरल्याने सर्वांनीच पालिकेवर ठपका ठेवला होता. मात्र गटारांवर पक्की अनधिकृत बांधकामे असल्याने गटार साफ करता येत नाहीत. ती तुंबली असल्याने पावसाचे पाणी भरल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मारुती आळी बंद करून तेथील गटाराचे काम गेली काही दिवस सुरू आहे. पालिकेच्या आजच्या कारवाईमुळे अशा अन्य कोणकोणत्या अनधिकृत बांधकामावर पालिका हातोडा हाणणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

loading image
go to top