‘तीन खोल्या, दोन शिक्षक आणि एक विद्यार्थी’

ॲड. विलास पाटणे
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

इंग्रजीच्या फाजील लाडामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी घसरत आहे. घसरणीचे प्रमाण असेच कायम राहिले तर पुढील ६०-६५ वर्षांत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य होईल, अशी भीती आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त व्यक्त करणारा लेख.

एका खेड्यामध्ये ‘तीन खोल्या, दोन शिक्षक आणि एक विद्यार्थी’ असं मराठी शाळेचं विदारक चित्र पाहायला मिळाले. नगरपालिकेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. इंग्रजीच्या फाजील लाडामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी घसरत आहे. घसरणीचे प्रमाण असेच कायम राहिले तर पुढील ६०-६५ वर्षांत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य होईल, अशी भीती आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्त व्यक्त करणारा लेख.

१३०० वर्षांची मराठीची समृद्ध परंपरा असलेले १० कोटी लोक जगातील १०० देशांमध्ये पसरलेले आहेत. ‘गाथा सप्तशती’ हा मराठीतील पहिला ग्रंथ. मराठीच्या ५० बोलीभाषा आहेत. दरवर्षी दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. महाराष्ट्रात ५०० दिवाळी अंक निघतात. तर छोटी मोठी दोनशे साहित्य संमेलने होतात. पुस्तकांची वार्षिक उलाढाल २५ कोटी रुपये होते. सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठे असे मराठी राज्यकर्ते भारतभर राज्य करीत होते. परंतु आज मराठीला राजाश्रय नाही आणि ‘अभिजात’ भाषेचा दर्जाही नाही.

जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण यांच्या झंझावातामुळे तरी ‘मराठी भाषेचा ध्वज दिमाखात फडकत ठेवला पाहिजे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच होणे चांगले असे अनेक मान्यवरांनी सांगितले आहे, पण ऐकतो कोण? आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून मोठी व्हावीत, असे पालकांना वाटते. त्यामुळे मुलांच्या अभ्यासातूनही मराठी हद्दपार होतेय.

आजच्या विलक्षण स्पर्धेतल्या युगामध्ये आपली मायबोलीवर केवळ भाबडे प्रेम करुन भागणार नाही. तर मराठी अधिकाधिक सशक्‍त होऊन ज्ञानभाषा झाली तरच ती इंग्रजीशी टक्कर घेऊ शकेल. मराठीच्या शब्दकोषात एक लाख शब्द आहेत. तर इंग्रजीत आठ लाखांच्या आसपास शब्द आहेत. बोलीभाषेचे शब्द मराठीने सामावून घेतले पाहिजेत. भाषा जेव्हा प्रवाही बनते, तेव्हाच ती वेगाने वाटचाल सुरु करते.

राज्यकर्त्यांमध्ये मराठी एक लोकभाषा, व्यवहार भाषा आणि ज्ञानभाषा होण्याचे दृष्टीने प्रयत्नांचा अभाव दिसतो. दक्षिणेकडील राज्ये आपापल्या भाषेकरीता जागरुक असतात. कन्नड भाषा ‘अभिजात’ होणेकरीता संपूर्ण कर्नाटक राज्य बंद होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मराठी भाषा संपन्न आणि श्रीमंत होण्याकरीता आपण सर्वांनी मराठीपणाची ज्योत तेवत ठेवली पाहिजे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात नंतर ती उच्चारातून आणि कृतीतूनच प्रकटतात. प्रदर्शनापेक्षा आंतरिक जाणिवेतून मराठी प्रेम प्रकट झाले तर ज्ञानेश्वर, तुकारामांची मराठी भाषा टिकून राहील. नाहीतर दरवर्षी बंद पडणाऱ्या मराठी शाळांच्या वाढत्या संख्येबरोबर उमाळेही वाढतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ad Vilas Patne article