स्वतंत्र मत्स्य विद्यापीठासाठी आग्रह धरावा - पाटणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी 500 कोटींची आर्थिक तरतूद शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने 20 वर्षे हा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सर्वंकष मत्स्य शिक्षण, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी मत्स्य विद्यापीठाचा आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले. 

रत्नागिरी - कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी 500 कोटींची आर्थिक तरतूद शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने 20 वर्षे हा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सर्वंकष मत्स्य शिक्षण, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी मत्स्य विद्यापीठाचा आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले. 

गेल्या अधिवेशनात मत्स्योद्योग मंत्री जानकर यांनी पुरवणी मागण्यांवेळी विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. याचा त्यांना विसर पडला आहे. मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीपासून एक हजार किमीवरील नागपूरच्या विद्यापीठाला जोडले गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. मुगणेकर समिती नेमली. समिती निर्णय देईल त्या ठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठीत करण्यात येईल, असे निःसंदिग्ध आश्वासन दिले. परंतु मुणगेकर समितीचा अहवाल धूळ खात पडला आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांना मत्स्य अभियांत्रिकी, पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मत्स्य अभियांत्रिकीचे सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण कोकणात मिळाले पाहिजे. मत्स्य उपलब्धी व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, मत्स्यसंवर्धन, मत्स्य जलशास्त्र, मत्स्यसंपत्ती व्यवस्थापन आणि मत्स्य शिक्षण विस्तार आदी अभ्यासक्रमांचा अंतर्भाव झाला पाहिजे. 

कोकणात 72 टक्के मत्स्योत्पादन 
एकूण मत्स्य उत्पादनापैकी 72 टक्के म्हणजे 4.4 लाख मेट्रिक टन उत्पादन 720 किमी लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. याउलट गोड्या पाण्यात जेमतेम 1.45 लाख मेट्रिक टन होते. 4300 कोटींचे मत्स्योत्पादन निर्यात होते. कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र व 70 खाड्यांच्या भोवती असलेले 14,445 हेक्‍टर खाजण क्षेत्रापैकी महाराष्ट्रात 5 टक्केदेखील वापर होत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ad. Vilas Patne comment