ओरोस : पहिलीत यंदा साडेपाच वयापर्यंत प्रवेश

नियम तिसऱ्यांदा बदलला; पुढच्या वर्षी मात्र सहा वर्षेच
The first Standerd Admission Process
The first Standerd Admission Processsakal

ओरोस : पहिली प्रवेशाबाबत राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांतील तिसरा बदल यंदा केला आहे. यावर्षी काढलेल्या नियमानुसार साडेपाच वर्षांच्या मुलांनाही पहिली प्रवेश मिळणार आहे; मात्र पुढच्या वर्षी सहा वर्षे पूर्ण झालेल्यांनाच पहिलीत जाता येईल. यासाठी सहा वर्षे पूर्ण करण्याची तारीख येत्या ३१ डिसेंबरची असेल; मात्र जानेवारी २०२३ मध्ये जन्मलेल्या मुलाला पुढच्या वर्षीच प्रवेश घ्यावा लागणार असल्याने बऱ्याच प्रमाणात समवयस्क असतानाही या मुलांच्या इयत्तेत तफावत राहणार आहे. त्यामुळे पालक वर्गात संभ्रमावस्था आहे.

पहिली प्रवेशाची विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मागील तीन वर्षांत शासनाने तीन वेगवेगळे आदेश जारी करून यात घोळ निर्माण केल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. शासनाने पहिली प्रवेशाची वयोमर्यादा एकदाच निश्चित करावी आणि दरवर्षी कायम ठेवावी, अशी मागणी केली जात आहे. जून २०१० च्या शासन निर्णयानुसार शाळा प्रवेशाचे वय ६ वर्षे निश्चित केले होते; मात्र पाच वर्षे पूर्ण झालेले बालक पहिली प्रवेशासाठी पात्र राहिल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ५ वर्षांची मुले पहिलीत दाखल करून घेतली जात होती. दरम्यान, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबाविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय. बी. अशा शाळांमधून वेगवेगळ्या दिनांकाला प्रवेश दिले जात होते.

यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार जानेवारी २०१५ ला शैक्षणिक वर्षाच्या ३१ जुलै या तारखेला (शासकीय भाषेत मानिव दिनांक) ६ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलाला प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले. जानेवारी २०१७ ला ही तारीख ३० सप्टेंबर करण्यात आली. जुलै २०१९ ला यात बदल करून ३० सप्टेंबरनंतर पुढे १५ दिवसांपर्यंत शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले. ३० सप्टेंबरला ६ वर्षे पूर्ण करणारा मुलगा आणि १ ऑक्टोबरपासून पुढील काही दिवसांत वयाची ६ वर्षे पूर्ण करणारा मुलगा या दोघांच्या शाळा प्रवेशाचे वर्ष वेगवेगळे होत आहे.

त्यामुळे पहिली प्रवेशाबाबत आपण मोठे असून मागे राहिलो आणि आपला मित्र आपल्यापेक्षा लहान असून पुढे गेला अशा प्रकारचा न्यूनगंड तयार होत आहे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणामी अभ्यासावर आणि एकूणच शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परीणाम होत असल्याची भीती पालकांमधून व्यक्त होऊ लागली आणि शाळा प्रवेश तारखेत दुरूस्ती करण्याची मागणी काही पालकांकडून पुन्हा सुरू झाली.

पहिली शाळा प्रवेशाबाबत मागील तीन वर्षात ३ वेळा वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित केले आहेत. आता ३१ डिसेंबर या तारखेवर प्रवेश देण्याचे निश्चित करून नव्याने आदेश निर्गमित झाला. या शासन निर्णयात ३१ डिसेंबर २०२२ चे किमान वय ६ वर्षे पूर्ण तर कमाल वय साडेसात वर्षे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान शाळा प्रवेश तारीख विषयावर ‘डेड एन्ड’ असणे आवश्यक आहे. मुलाचा जन्म कोणाच्याच हातात नसतो. त्यामुळे वयाची ६ वर्षे पूर्ण करण्याचा महिनाही त्याच्या जन्मानुसार आपोआप बदलतो.

शासनाने प्रवेशाबाबत ठरवून दिलेल्या तारखेनुसार प्रवेश दिला जात आहे. आता नवीन शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२२ ला वयाची ६ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलाला सत्र सुरू होतानाच म्हणजेच जून २०२२ मध्येच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशावेळी मुलाचे वय साडेपाच वर्षे असेल तर जानेवारी २०२३ मध्ये वयाची सहा वर्षे पूर्ण करणाऱ्यांना २०२२ ऐवजी २०२३ मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना कालावधीमुळे काही विद्यार्थी शाळेत प्रवेश घेऊ शकले नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार ७ वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकाला दुसरीच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक आहे; मात्र कोरोना काळात मुलाचा पहिलीचाच अभ्यास पूर्ण होऊ न शकल्याने त्याचे एकदम दुसरीत जाऊन नुकसान होऊ नये, या उद्देशाने ३ मार्च २०२२ चा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामध्ये पहिली प्रवेशाचे वय ३१ डिसेंबर २०२२ ला किमान ६ वर्षे पूर्ण, तर ३१ डिसेंबर २०२२ ला कमाल साडेसात वर्षे असावे, असे स्पष्ट आहे.

-महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com