कोकणात २५ वर्षानंतर फ्लेमिंगोचे दर्शन ; पक्षीमित्रांना पर्वणी

चंद्रशेखर जोशी
Saturday, 24 October 2020

कोकणात फ्लेमिंगोच्या या पहिल्याच दर्शनामुळे पक्षीमित्रांमध्ये कुतूहल जागे झाले असले तरी पृथ्वीवरील बदलत्या हवामानाच्या घातक परिणामांचे ते द्योतक आहे.

दाभोळ (रत्नागिरी) : मुंबई, उरण येथील खाड्यांमध्ये हमखास दिसणारा रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पक्षी महाड जवळील सावित्री खाडीत गेल्या आठवड्यात पक्षीमित्रांना दिसला. कोकणात फ्लेमिंगोच्या या पहिल्याच दर्शनामुळे पक्षीमित्रांमध्ये कुतूहल जागे झाले असले तरी पृथ्वीवरील बदलत्या हवामानाच्या घातक परिणामांचे ते द्योतक आहे.

अपुरी जागा, वाढते प्रदूषण आणि कांदळवनावरील नवनवीन प्रकल्प यामुळे तळकोकणाकडे काही सापडतं का, असं परीक्षण करण्याकरिता ते थेट बाणकोट खाडीच्या उगमाकडे म्हणजेच महाडकडे आलेले असावेत, असे मत सीस्केप संस्थेचे पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले. एक आठवड्यापूर्वी रोहित पक्षी काही काळ महाडजवळ सावित्री खाडीत थांबले आणि थोड्या वेळातच ते तिन्ही  पक्षी पुन्हा हवेत झेपावले.

हेही वाचा - निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील दुर्गा

पश्‍चिमेकडील वीरच्या खाजणी कांदळवनात काहीतरी शोधून पेणच्या दिशेने रवाना झाल्याचे वन्यजीव पक्षी अभ्यासक रूपेश वनारसे यांनी सांगितले. खरंतर हे कोकणातील पक्षी अभ्यासकांसाठी आश्‍चर्यच आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या पक्षी निरीक्षणात इथल्या अभ्यासकांच्या नोंदणीत रोहित पक्ष्यांचे हे पहिलेच नामांकन. खाडीतला रोहित हा स्थलांतर करणारा पक्षी मुंबईच्या पक्षीगणातील मानबिंदू आहे. ठाणे, शिवडी, उरण आणि अगदी अलिबाग, पेणपर्यंत तो सर्वत्र दिसतो.

वडखळ फाट्यावरील नवीन उड्डाणपुलावरून पश्‍चिमेकडील पाणथळात त्यांचे तुरळक थवे नजरेस पडतात. गेल्या अकरा वर्षामध्ये या हिवाळी स्थलांतरित पक्ष्याने मुंबई ते पेण इथल्या खाजणी भागावर नवीन जागा शोधण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहे. शिवाय अतिवृष्टी, अवर्षण आणि तापमान बदलाचे नैसर्गिक वादळ या सर्वांनीच स्थलांतराच्या बाबतीत अनिश्‍चित बदल घडवून आल्याचे हे द्योतक आहे. अर्थात या सर्वांना कारणीभूत भूतलावरचा अनैसर्गिक प्राणी म्हणजे माणूस हाच आहे, असे मत पक्षीमित्र रूपेश वनारसे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -  कोकणात महामार्गावर पीक सुकवण्याची वेळ

पर्यावरण प्रेमींसाठी आव्हान

कोकणात महाडच्या पक्षीप्रेमींसाठी रोहितसारखा सुंदर पक्षी महाड परिसरात स्थलांतरित होणे, ही एक पर्वणीच आहे; परंतु बदलते हवामान आणि निसर्गातील घडामोडी यांचा विपरित परिणाम या पक्ष्यांच्या स्थलांतरित  थांब्यावर होत आहे, ही चिंतेची बाब असल्याने रोहित पक्ष्यांचे हे असे येणे पर्यावरणप्रेमींसाठी एक आव्हान  ठरणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 25 years flemingo coming in savitri river in ratnagiri its good for birds friendly people