esakal | तीन धरणे कधीही फुटू शकतात; पण दुरूस्ती पावसाळ्यानंतर!
sakal

बोलून बातमी शोधा

Tiware Dam

तिवरे धरण फुटल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पूल तुटल्यानंतर राज्यातील पुलांचे ऑडिट झाले तसे तिवरे धरण फुटल्यानंतर आता राज्यातील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तीन धरणे कधीही फुटू शकतात; पण दुरूस्ती पावसाळ्यानंतर!

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.. जिल्ह्यातील आणखी तीन धरणे धोकादायक झाली असल्याचा अहवाल जलसंधारण विभागाने सादर केला आहे. त्यानुसार तुळशी, शेल्डी आणि राजेवाडी यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे पाऊण कोटी रुपयांचे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठविले आहे. त्यापैकी दोनच धरणांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे. पण ही दुरुस्ती पावसाळ्यानंतर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तीनही धरणांजवळील गावांवर टांगती तलवार कायम असेल. 

तिवरे धरण फुटल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पूल तुटल्यानंतर राज्यातील पुलांचे ऑडिट झाले तसे तिवरे धरण फुटल्यानंतर आता राज्यातील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सर्वांत जास्त पाऊस कोकणात पडतो. सुमारे साडेतीन हजार मि.मी. कोसळणाऱ्या पावसाचा विचार करून धरणांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पावसापूर्वी ऑडिट होणे आवश्‍यक आहे. मात्र दुर्घटना घडेपर्यंत प्रशासन याकडे लक्षही देत नाही. 

शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यातील एकूण 14 धरणे येतात. या धरणांमध्ये चिंचाळी, तुळशी, शेल्डी, कुरवळ, तिवरे, राजेवाडी, मोर्डे, हर्दखळे, इंदवटी, कुवा, कशेळी, परुळे, जुवाटी आणि वाटुळ या धरणांचा समावेश आहे. जलसंधारण विभागाने पावसापूर्वी या चौदा धरणांच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती. त्यामध्ये तुळशी, शेल्डी, राजेवाडी या तीन धरणांची दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ती धोकादायक आहेत.

तुळशी धरणाच्या दुरुस्तीसाठी 16 लाख 48 हजार, शेल्डीसाठी 25 लाख 54 हजार आणि राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी 34 लाख 8 हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्र तयार करून मंजुरीसाठी शासनाला पाठविण्यात आले. पैकी तुळशी आणि शेल्डी धरणाच्या अंदाजपत्रकाला शासनाने मान्यता दिली आहे. जलसंपदा विभागाने ही अधिकृत माहिती दिली. 

''तुळशी, शेल्डी, राजेवाडी या तीन धरणांची दुरुस्ती अत्यावश्‍यक असल्याचा अहवाल आहे. त्यानुसार आम्ही शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर झाला की पावसानंतर धरणांची दुरुस्ती केली जाईल.'' 
-सुशील लाड, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी

तिवरे धरण फुटले

loading image
go to top