esakal | व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे शिक्षक भरती पुन्हा वादात 
sakal

बोलून बातमी शोधा

व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे शिक्षक भरती पुन्हा वादात 

सावंतवाडी - मोठा गाजावाजा करून प्रक्रिया राबवलेली शिक्षणसेवक भरती वादात सापडली आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घ्यायला वाव निर्माण करणारी ऑडिओ क्‍लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्गाचा उल्लेख असून टीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड झाल्याचा संवाद या क्‍लिपमध्ये आहे. 

व्हायरल ऑडिओ क्‍लिपमुळे शिक्षक भरती पुन्हा वादात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - मोठा गाजावाजा करून प्रक्रिया राबवलेली शिक्षणसेवक भरती वादात सापडली आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घ्यायला वाव निर्माण करणारी ऑडिओ क्‍लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्गाचा उल्लेख असून टीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड झाल्याचा संवाद या क्‍लिपमध्ये आहे. 

या प्रकरणी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेने आवाज उठवला आहे. भरतीमध्ये कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सदोष होत असून त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे निवेदनही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन यात किती गांभीर्याने लक्ष देते हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

शिक्षक भरतीबाबत दर ठरला असल्याचा संवाद असलेली ऑडिओ क्‍लिप यापूर्वीच व्हायरल झाली होती; मात्र निवडणूका व इतर प्रक्रियेमुळे त्याकडे शासनाकडून योग्य ती चौकशी झाली नाही. मागील दोन वर्षापासून राज्यातील शिक्षक भरतीचे घोंगडे भिजत आहे. पहिली निवड यादी नऊ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. यात अनेक दोष असल्याने राज्यातील डीएड बीएड धारकांचा उद्रेक झाला. मेरीट खूपच जास्त लागल्याने राज्यातील डीएड बीएडधारकांनी मंत्रालय व आयुक्त कार्यालयात आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे सोळाला प्रसिद्ध होणारी दुसरी निवड यादीही पुढे ढकलली गेली. यावेळी 9 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्थांची मुलाखतीशिवाय पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली; परंतु या यादी नंतर डीएड बीएड धारकांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार, शिक्षण उपसचिव चारुशिला चौधरी यांना भेटून तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी विविध भरती बाबत असलेल्या समस्या सांगितल्या. 

शासनाने निर्णय पारित करून निम्न प्राथमिक पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिकसाठी सहावी ते आठवी टीईटीच्या दोन स्वतंत्र परीक्षा घेतल्या. तसा उल्लेखही प्रमाणपत्रावर केला आहे; मात्र या भरतीत नियुक्‍त्या देताना 6 वी ते 8 वीच्या पात्र उमेदवारांना 1 ते 4 साठी नियुक्‍त्या देण्यात आल्या आहेत. या निर्णयाने पहिली ते पाचवीसाठी उत्तीर्ण टीईटी उमेदवारांवर अन्याय केला आहे. जर परीक्षा वेगवेगळ्या झाल्या, मग दुसऱ्या टीईटीवाल्यांना 1 ते 4 साठी संधी का देण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला. 

निवड यादी सदोष असल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. त्यात व्यापमसारखा घोटाळा करणाऱ्या आयटी कंपनीकडे या भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या भरतीत मोठा घोळ झाला असल्याचे आरोप होत आहेत. प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांच्या संख्येबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आल्यामुळे भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा निवेदनातून संघटनेने दिला आहे. या भरतीमध्ये निवड यादी जाहीर केल्यानंतर माजी सैनिकांच्या सुमारे 1200 जागा रिक्त आहेत. तसेच जे उमेदवार विहीत कालावधीत कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाहीत किंवा कागदपत्र पडताळणीतून बाहेर पडले त्या जागी तत्काळ नवीन उमेदवार देण्यात यावे, अशी मागणी अभियोग्यता धारकांमधून होत आहे. 

ही स्थिती असताना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक ऑडिओ क्‍लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख आहे. टीईटी नापास झालेल्या एका उमेदवाराला नियुक्‍ती मिळाल्याचा संवाद यामध्ये आहे. यामुळे ही भरती आणखी वादात सापडली आहे. 

""शिक्षक भरतीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून सरकार मात्र बघ्याची भूमिका देत आहे. ट्विटर सह इतर प्रसार माध्यमातून अभियोग्यता धारकानी शिक्षण मंत्र्यांचे यासाठी लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे व कोणतेही सूतोवाच त्यांनी केले नाही तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.'' 
- राहुल खरात,
पुणे 

""शिक्षक भरतीबाबत सिंधुदुर्गाचे नाव पुढे येत आहे टीईटी अनुत्तीर्ण उमेदवाराची भरती कशी काय होऊ शकते हा मोठा प्रश्न आहे. शिक्षक भरतीत सुरू असलेले गैरप्रकार थांबवून योग्य पद्धतीने भरती प्रक्रिया व्हायला हवी. अन्यथा अभियोग्यता उमेदवार हे गप्प बसणार नसून वेळ आली तर आपण मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचाही निर्णय घेऊ.'' 
- भाग्यश्री रेवडेकर,
अभियोग्यताधारक उमेदवार 
 
 

loading image
go to top