साटेलीत महावितरणविरुद्ध उद्रेक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

दोडामार्ग - साटेली आवाडे येथे आज संतप्त वीज ग्राहकांनी दोडामार्ग- तिलारी रस्त्यात झाडे तोडून टाकत रस्ता रोखला. महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा तीव्र निषेध केला. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. 

दोडामार्ग - साटेली आवाडे येथे आज संतप्त वीज ग्राहकांनी दोडामार्ग- तिलारी रस्त्यात झाडे तोडून टाकत रस्ता रोखला. महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा तीव्र निषेध केला. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. 

विजेच्या उच्च दाबामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय गेले चार दिवस वीजच नसल्याने आवाडेतील मुस्लिम व ख्रिश्‍चनवाडीतील ग्रामस्थांसह अन्य वीज ग्राहकांनी आंदोलन केले.

खासगी मोबाईल कंपनीच्या केबलसाठी खोदाई केल्याने चामुंडा सभागृहाजवळील मोठा वृक्ष कोसळून पडला. त्यात वीज वाहिन्या तुटून पडल्या; मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानेही ग्रामस्थ भडकले होते. विजेच्या उच्च दाबामुळे ख्रिश्‍चनवाडी व मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची विद्युत उपकरणे, विजेचे बल्ब, रेफिजरेटर, टीव्ही संच, पाणी खेचण्याच्या मोटारी, मोबाईल, चार्जर, वॉशिंग मशीन जळून खाक झाले. दोन्ही वाडीतील 80 टक्के ग्रामस्थांची घरगुती विद्युत उपकरणे जळाली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे; मात्र दोन दिवस उलटले तरी महावितरणने याची कसलीही दखल घेतली नाही.

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आणि नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कंपनीने हालचाल न केल्याने आज दीडशेहून अधिक ग्रामस्थ महावितरण विरोधात रस्त्यावर उतरले. आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.

आंदोलकांनी दोन्ही बाजूला झाडे तोडून टाकली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपअभियंता रवींद्र देहारे आणि पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक रायगौडा पाटील पोलिस कुमक घेऊन उशिरा पोचले. त्यांना वीज ग्राहकांनी धारेवर धरले. त्यानंतर श्री. देहारे यांनी उद्या (ता. 13) नुकसानीचे पंचनामे करून वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, सरपंच संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, मायकल लोबो, जयवंत आठलेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी देहारे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. 
 
शाखा अभियंता विनापरवाना रजेवर 
गेले चार दिवस ग्राहक जीवन मरणाशी झुंजताहेत; पण शाखा अभियंता कुठे आहेत? त्यांना समोर आणा, असे विचारताच श्री. देहारे यांनी ते विनापरवाना रजेवर असल्याचे सांगितले. त्यावर सर्वांनी त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against Mahavitaran in Sateli Sindhudurg