खाणकामगार बनलेला गुंड जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar police action Miners Hooligan Jailed

खाणकामगार बनलेला गुंड जेरबंद

रत्नागिरी/पावस : अहमदनगर पोलिसांनी वेषांतर करून चिरेखाणीवरील ट्रॅक्टरचालक, मजूर बनून एका कुविख्यात गुन्हेगाराला जेरबंद केले. तालुक्यातील पावसजवळील चांदोर येथे ही कारवाई करण्यात आली. तीन दिवस दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी खात्री पटल्यानंतर नाव बदलून राहणाऱ्या त्या गुंडाच्या घरावर धाड टाकली, मात्र पोलिसांची कुणकुण लागताच तो पळून गेला. पोलिसांनी तीन किमी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला पकडले. या गुन्हेगारावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात मोकासह तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत.

संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले असे त्या कुविख्यात गुंडाचे नाव आहे. चांदोर येथील चिरेखाणीवर तो विजय नारायण भोसले (रा. वाहिरा, बीड) या नावाने वावरत होता. गेले अनेक दिवस संदीपने चांदोर येथे वास्तव्य केल्याने त्या भागातही चोरीचे व इतर गुन्हे केले आहेत का याचा उलगडा लवकरच होणार आहे. राज्यभरात मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संदीपने रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथे आश्रय घेतला होता. त्याआधी संदीप भोसले याने आपल्या साथीदारांसह ११ जून २०१९ ला भरदुपारी पारनेर येथील एका वृद्धाच्या खाणकामगार बनलेला गुंड जेरबंद

घरावर दरोडा टाकून सोन्याचा ऐवज लंपास केला होता. गुन्ह्याच्या स्वरूपावरून हा गुन्हा सराईत गुन्हेगारांने केलेला असल्याच्या शक्यतेने अहमदनगर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी मिलन ऊर्फ मिलिंद ईश्वर भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १ लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या वेळी त्याने आपण संदीप भोसले, मटक भोसले, पल्या भोसले, अटल्या भोसले यांच्या मदतीने दरोडा घातल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून संदीप भोसले हा फरार होता. संदीप पावसनजीक चांदोर येथे एका खाणीवर कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती नगर पोलिसांना मिळाली. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, कॉन्स्टेबल सागर ससाणे, रणजित जाधव यांच्या पथकाने चांदोर येथे कामगिरी फते केली.

दृिष्टक्षेपात

पोलिसांचे वेषांतर, बनले ट्रॅक्टरचालक, मजूर ३ किमी पाठलाग करून सिनेस्टाईल पकडले नाव बदलून चांदोरमध्ये अनेक महिने वावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आदी गुन्हे अहमदनगर, बीड, पुण्यात मोकाची कारवाई

२६ गुन्ह्यांमध्ये फरारी

संदीप भोसले हा कर्जत येथील कुविख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर अहमदनगर, पुणे, सातारा, बीड,औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अवैध हत्यारे बाळगणे, आदी ४४ गुन्हे दाखल आहेत, तर अहमदनगर, बीड, पुणे येथे त्याच्यावर मोकाअंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. तो एकूण २६ गुन्ह्यांमध्ये फरारी आहे.

Web Title: Ahmednagar Police Action Miners Hooligan Jailed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..