esakal | रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शहरातील हवा प्रदूषणमुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शहरातील हवा प्रदूषणमुक्त

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! शहरातील हवा प्रदूषणमुक्त

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : शहराची हवा प्रदूषणाची (air pollution) पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांच्या मानांकनाच्या मर्यादेत आहे. लॉकडाउनमुळे (lockdown) वाहनांच्या कमी प्रमाणातील वर्दळीमुळे शहराची हवा प्रदूषण पातळी मानांकनाच्या मर्यादेत आहे. शहरातील वातावरण निरोगी आहे, असा निष्कर्ष मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी (ratnagiri) उपकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या अभ्यासातून काढण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ( Maharashtra Pollution Control Board) अनुदानातून शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या रत्नागिरीतील (कै.) डॉ. धनंजय कीर उपकेंद्रात सुरू आहे. या प्रकल्पाचा औपचारिक उद्‍घाटनप्रसंगी प्रकल्पप्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी शहराच्या हवा प्रदूषण प्रकल्पाबद्दल माहिती दिली. शहरातील हवा प्रदूषण मापनासाठी रत्नागिरी उपपरिसराची कार्यालयीन इमारत (टेरेस) आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीचा समावेश आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील एसओ २, एनओ २ व पीएम १०, पीएम २.५ (धूलिकण) या हवा प्रदूषण घटकांचे मोजमाप केले जाते. गेल्या पाच महिन्यांच्या नोंदीत रत्नागिरी शहर प्रदूषणमुक्त असल्याचे दिसले आहे.

हेही वाचा: उद्धवजी, हे करून दाखवाच!

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मानांकनानुसार सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचे प्रमाण कमी आले. सीओटू आणि एनओटूचे प्रमाण ८० मायक्रोग्रॅम परमीटर क्यूबच्या दरम्यान असणे आवश्यक असते. रत्नागिरीतील नोंदी मानांकनाच्या खाली आहेत. पीएम १० (धुलिकण)चे मानांकन १०० मायक्रोग्रॅम परमीटर क्युब आणि पीएम २.५ चे मानांकन ६० मायक्रोगॅम पर मीटर क्युब अपेक्षित आहे.

पीएम २.५ धुलिकण हे श्‍वसन नलिकेतून फुफ्फुसात प्रवेश केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. शहरातील दोन ठिकाणी घेतलेल्या नोंदी या प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहेत. मार्च २०२३ मध्ये याचा अहवाल राज्य शासनाच्या प्रदूषण मंडळाकडे सादर केला जाईल. यात वैज्ञानिक सहाय्यक अजय गौड, क्षेत्र सहाय्यक सुशांत कुंभार आणि कैलास जाधव हे सहाय्य करीत आहेत. उद्‍घाटन सोहळा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळिराम गायकवाड आणि उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

हेही वाचा: लई भारी! कोल्हापुरच्या सोनालीचा व्हिडीओ प्रियंका चोप्राने केला शेअर

loading image
go to top