कोकणात अळंबी उत्पादन ठरु शकते भातशेतीला जोडव्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

भातशेतीला पूरक व्यवसाय म्हणून अळंबी उत्पादन हा व्यवसाय खूप महत्त्वाचा व फायद्याचा आहे.

दाभोळ (रत्नागिरी) : ‘‘कोकणातील शेतकऱ्यांनी फक्‍त भातशेती करून चालणार नाही तर भातशेतीला जोड म्हणून काही पूरक व्यवसायही केले पाहिजेत. भातशेतीला पूरक व्यवसाय म्हणून अळंबी उत्पादन हा व्यवसाय खूप महत्त्वाचा व फायद्याचा आहे. सध्या अळंबीला बाजारात मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अळंबी उत्पादन करावे व त्याची विक्रीही करावी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांनी केले.

हेही वाचा - मुरमाच्या मातीत मेहनत आली फळाला ; चार गुठ्यांत फुलवला झेंडू -

अळंबीपासून प्रक्रिया करून त्यापासून अळंबीचे कुरकुरे, बिस्किटे,लोणचे इत्यादी विविध पदार्थ बनविता येतील. यासाठी आपण अळंबीचे उत्पादन वाढवून त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावेत व त्याचे विपणन करावे, असे आवाहन त्यानी अळंबी उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात दहागांव येथे केले. विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांनी अळंबी उत्पादन प्रशिक्षणाची योग्य ती माहिती समजावून घ्यावी व अळंबी उत्पादन व्यवसाय सुरू करावा यासाठी योग्य नियोजन व जोखीम घेणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करावा, असे सांगितले.

हेही वाचा -  कोकण मार्गावर शुक्रवारपासून धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या -

उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुंटे यांनी शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिली व रोपवाटिका, यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच भविष्यात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्याद्वारे विविध उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करावी, असे सांगितले. या प्रशिक्षणासाठी ६९ शेतकरी सहभागी झाले होते. 
अळंबी तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद बोरकर यांनी प्रास्ताविक केले. अळंबी उत्पादन प्रशिक्षणाची माहिती दृकश्राव्य पद्धतीने करून देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक डॉ. श्रीकांत रिटे यांनी करून दाखविले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alambi production is helpful to rice crop farmers start this business in ratnagiri