डोक्याला ताप...लाॅकडाउनचा असाही गैरफायदा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे. 

सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग) - कसाल-मालवण रोडवरील श्री देव काजरोबा मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर तळीरामांच्या जोरदार पार्ट्या दिवस-रात्र सुरू असल्याने या मोकळ्या जागेत दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. नशेमध्ये दारूच्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे रानात गुरे चरविणाऱ्या गुराख्यांना तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तरी पोलिस प्रशासनाने संबंधित तळीरामांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

गेली अनेक वर्षे, पिढ्यानपिढ्या या माळरानावर शेतकरी उदरनिर्वाहासाठी भूईमुग, नाचणी, वरईचे पीक घेत होते. हळूहळू ही शेती कमी झाल्याने त्याठिकाणी क्रिकेटचे मैदान तयार झाले; मात्र यंदा मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे दोन-चार महिन्यांमध्ये क्रिकेटपटूंनी या पटांगणावर क्रिकेट खेळणे थांबविले; मात्र त्याच जागेवर तळीरामांच्या मोठ्या पार्ट्या सुरू होऊ लागल्या. त्यामुळे पार्ट्या करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याठिकाणी टाकून त्या फोडून सर्वत्र पटांगणावर काचांच्या तुकड्यांचे साम्राज्य दिसत आहे. 

गुराखींना त्रास 
गुरे चारण्यासाठी घेऊन जात असताना फोडलेल्या बाटलीच्या काचांच्या तुकड्यामधून गुराख्यांना मोठा संघर्ष करत पुढे जावे लागत आहे. शेकडोने विविध प्रकारच्या बाटल्याचे तुकडे पडल्यामुळे ते गोळा करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे जनावरांच्या पायाला तसेच गुराखींच्या पायाला मोठ्या जखमा होऊ शकतात. याकडे पोलिस प्रशासनाने लवकरच निर्बंध आणावा. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला कळविले असून त्याठिकाणी पार्ट्या करणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol parties kasal sindhudurg district