आता कोकणातील दुर्गम भागात पर्यटनाला जाता येईल कॅराव्हॅन सोबत

राजेश शेळके
Monday, 26 October 2020

दुर्गम पर्यटन स्थळांच्या आनंदासाठी

कोकणसाठी उपयुक्त ; गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दाखल  

रत्नागिरी : राज्यातील किंवा कोकणातील दुर्गम मात्र आकर्षक पर्यटन स्थळांचा पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. अशा ठिकाणी पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुविधानियुक्त आलिशान कॅराव्हॅन त्यांच्या दिमतीला असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही व्यवस्था केली असून अशी अलिशान कॅराव्हॅन प्रथमच तालुक्यातील गणपतीपुळे तिर्थक्षेत्रात दाखल झाली.

महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. यामध्ये निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, ऐतिहासिक वारसास्थळे, नद्या, धरणे, थंड हवेची ठिकाणे, अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. मात्र यातील अनेक पर्यटनस्थळे दुर्गम ठिकाणी आहेत. तेथे हॉटेल, रिसॉर्ट किंवा निवासस्थानांची सोय नाही. पर्यटनासाठी गेल्यास तेथे तोंड द्यावे लागणार्‍या गैरसोयीमुळे या ठिकाणांकडे अनेक पर्यटक पाठ फिरवतात.

हेही वाचा- आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल -

मात्र अशा पर्यटन स्थळांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठी कॅराव्हॅन ही सर्वसुविधांनी युक्त अशा आलिशान गाडीची व्यवस्था पर्यटन विकास महामंडळाने केली आहे. अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बांधकामासाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिदुर्गम भागात हॉटेल, निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

अशा ठिकाणी, तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅनद्वारे पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, असे हे राज्य शासनाचे पर्यटन धोरण आहे. घरात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये ज्या सुविधा असतात, त्या सुविधांप्रमाणे सर्व सुविधा कॅराव्हॅनमध्ये आहेत.पर्यटन वाढीला चालणा देण्यासाठी कॅराव्हॅन एक महत्वाचा दुवा ठरणार आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त कॅराव्हॅनआलिशान गाडी प्रथमच गणपतीपुळे येथे दाखल झाली. यावेळी सर्व पर्यटकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

हेही वाचा- ही तर कोकणी शेतकऱ्यांची चेष्टा ; ठाकरे सरकार काय मदत देणार ? - ​

व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाक घर

 पाश्‍चात्य देशांमध्ये शहरात बंगले असणार्‍यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागेत कॅराव्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाक घर, दूरचित्रवाणी संच, वीज, शीत कपाट, स्वच्छतागृह, झोपण्यासाठी बेड, अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alishan Caravan Ganpatipule entered the pilgrimage site arrangement made by Maharashtra Tourism Development Corporation