आंबेनळी अपघातातील मृतांच्या वारसांना लाल फितीचा जाच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

दाभोळ -  मागील वर्षी २८ जुलै रोजी आंबेनळी घाटात विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघातात कृषी विद्यापीठातील मृत्युमुखी पडलेल्या ३० कर्मचाऱ्यांपैकी २७ जणांच्या कायदेशीर वारसांना नोकरीत घेण्याच्या विशेष अनुकंपा प्रस्तावाच्या मंजुरीस शासन सकारात्मक आहे. तरी अद्याप मंत्रालयीन पातळीवर हा प्रस्ताव निर्णयाविनाच फिरत आहे.

दाभोळ -  मागील वर्षी २८ जुलै रोजी आंबेनळी घाटात विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघातात डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मृत्युमुखी पडलेल्या ३० कर्मचाऱ्यांपैकी २७ जणांच्या कायदेशीर वारसांना नोकरीत घेण्याच्या विशेष अनुकंपा प्रस्तावाच्या मंजुरीस शासन सकारात्मक आहे. तरी अद्याप मंत्रालयीन पातळीवर हा प्रस्ताव निर्णयाविनाच फिरत आहे.

मुख्य सचिवांकडून ही फाइल दोन दिवसांपूर्वी पुन्हा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविल्याने हा विषय रेंगाळण्याची धास्ती निर्माण झाली आहे. याचबरोबर कर्मचारी भरती व सानुग्रह अनुदान हे दोन प्रस्तावही कृषी व वित्त विभागाकडेच पडून आहेत. अधिवेशन काळात कोकणातील लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी हे विषय तत्काळ मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आहे.

आंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ३० जणांच्या वारसांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल, अशी आश्वासने सर्वांकडून देण्यात आली. मात्र अद्याप या विषयाला मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजुरी न मिळाल्याने अन्य विभागातील टेबलांवरच ही फाइल रेंगाळली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 

त्यानंतर या विषयाची फाइल कृषी, वित्त विभागाकडून काही अटी शर्ती शिथिल करण्याचे मान्य करून मुख्य सचिवांकडे पाठविल्या. ही फाइल आता पुन्हा सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविली. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे असा या प्रस्तावाचा प्रवास सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव रखडू शकतो. 

२००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत असताना मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचे विशेष सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. त्याच निर्णयास अनुसरून अपघातात मृत्यू पावलेल्या व त्यातील २००५ नंतर सेवेत कायम झालेल्या १२ ते १३ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा असा प्रस्ताव २१ डिसेंबर २०१८ ला  पाठविण्यात आला आहे. तोही वित्त विभागाकडे पडून असल्याचे कळते. 

कार्यकारी परिषदेवर सदस्याकडून अपेक्षा
आमदार संजय कदम, संजय केळकर, हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, निरंजन डावखरे हे कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून काम करीत आहेत. या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन या प्रस्तावांचा पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambenali accident special story