
Ambet Mhapral Bridge : दुरुस्तीची वाट पाहतोय रखडलेला आंबेत पूल
मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला असून शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या पुलाचे भविष्य अंधारात आहे. मंडणगड, दापोली तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीत महत्वाची भूमिका राहिलेला हा पूल आजही दुरुस्ती न झाल्याने बंदच ठेवण्यात आला आहे. या प्रश्नासाठी तीन तालुक्यातील नागरिकांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आल्याने मंडणगड दापोली व म्हसाळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष समितीच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे. राज्यात तीन महिन्यापूर्वी झालेल्या सत्तातरानंतर अस्तित्वात आलेले नवीन शासन तीन तालुक्यातील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर यंदाचे बांधकाम हंगामात कोणती भूमिका घेते या विषयी प्रचंड उत्सुकता आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या दापोली येथे झालेल्या मेळाव्यात महाड व दापोली मतदार संघाच्या आमदारांनी या प्रश्नाचा उल्लेख केला असला तरी या संदर्भात कोणतीही आश्वासक घोषणा अद्याप झालेली नाही. महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर जीर्णतेच्या समस्येमुळे सार्वत्रिक चर्चेत आलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या नादुरुस्तीचा प्रश्न गेली चार वर्षे रखडलेला आहेच. तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी पुलाचे सुदृढीकरणास ११ कोटींचा निधी मंजूर करूनही नंतरच्या काळात प्रशासकीय यंत्रणांनी कूर्मगतीने केलेले काम, वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या, राज्यात झालेले सत्तांतर एका का अनेक समस्यांमुळे गेल्या दोन वर्षात पूल तिसऱ्यांदा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडी शासनाने जेटीच्या पर्यायी वाहतुकीची सोय उपलब्ध करून निर्माण केलेली व फार व्यवहार्य नसणाऱ्या व्यवस्थेचे आधार या मार्गावरील
वाहतूक आणखी किती काळ चालू शकेल या विषय़ीची शंका निर्माण झाली आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या सत्तातरांमुळे नवीन शासन नवीन धोरण ठरवणार ही बाब ध्यानात घेता या पुलाचे पर्यायाने दापोली-मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठ्या रहदारीचे भविष्यच एका अर्थाने अंधःकारात सापडले आहे.
नवीन पुलाची मागणी
खासदार सुनील तटकरे यांनी पर्यायी नवीन पुलाचे अंदाजपत्रक तयार होत असल्याचे म्हाप्रळ येथील भेटीदरम्यान सांगितले. आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हाप्रळ–आंबेत नवीन पुलाची मागणी केली आहे; मात्र हे प्रयत्न पुरेस नसल्याचे चित्र आहे. त्यातच या पुलास संलग्न असलेल्या आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे कामही गेल्या चार वर्षापासून रखडलेले आहे.
रस्तेमार्गाच्या विकासप्रक्रियेत म्हाप्रळ-आंबेत पुलाने मंडणगड तालुक्याला जगाशी जोडले हे वास्तव आहे. तालुक्यातील व्यापारउदीम कायम राहण्यासाठी खाडीवर असलेला हा पूल ही तालुक्याची पायाभूत गरज अग्रक्रमाने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
- विजय ऐनेकर, मंडणगड