esakal | रुग्णवाहिका साडेपाच तास उशिरा आल्याने महिलेने गमाविला जीव, सिंधुदुर्गातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

0

संबंधित महिलेच्या मुलाचाही अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे.

रुग्णवाहिका साडेपाच तास उशिरा आल्याने महिलेने गमाविला जीव, सिंधुदुर्गातील प्रकार

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण  (जि. सिंधुदुर्ग) : शहरातील सोमवारपेठ भागात राहणाऱ्या एका कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिला जीव गमवावा लागला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. 

मालवणात कोरोना रुग्णांची संख्या ही काहीशी दखल घेण्याजोगीच राहिली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात येथील सोमवार पेठ भागातील एक 65 वर्षीय वृद्ध महिला मुलासमवेत दुपारी साडेबाराच्या सुमारास तपासणीसाठी गेली होती. त्या ठिकाणी दोघांचीही कोरोना तपासणी झाल्यावर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्याने तिला पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांनी दिला. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली; मात्र येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. 

रुग्णालय प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधून 108 रुग्णवाहिकेची मागणी केली. यावेळी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका बोलविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले; मात्र, पाच तास उलटून गेले तरी रुग्णवाहिका आली नाही. याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी, मित्र परिवाराने रुग्णवाहिका तातडीने मागवा, अशी वारंवार विनंती केली. अखेर सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास कुडाळ येथून 108 रुग्णवाहिका येथे दाखल झाल्यानंतर संबंधित महिलेला मुलासह ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र रात्री त्या महिलेला आपला प्राण गमवावा लागला. 

नातेवाईकांकडून ग्रामीण रुग्णालयावर आरोप
येथील ग्रामीण रुग्णालयामुळेच त्या महिलेला प्राण गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांमधून होऊ लागला आहे. वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्यानेच उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची व्यवस्था आहे; मात्र ती नादुरुस्त आहे. शिवाय अपुरा चालक वर्ग आणि कारभार यामुळे ग्रामीण रुग्णालय टीकेचे लक्ष्य बनले आहे.  

संपादन : विजय वेदपाठक  

 
 

loading image