भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेना मैदानात ?

मुझफ्फर खान
Monday, 9 November 2020

राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे. आगामी पालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचयाती निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती आहेच.

चिपळूण (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात शिवसेना अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. मेळावे, बैठका, पक्षप्रवेश, रक्तदान शिबिर या माध्यमातून शिवसेनेने वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे. आगामी पालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचयाती निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती आहेच. शिवाय भाजपच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचेही बोलले जात आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून वर्षभरापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या निर्णयांची अमंलबजावणी केली. साहजिकच पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. परंतु दसरा मेळाव्याला ठाकरेंनी तडाखेबंद भाषण करून शिवसेनेमधील मरगळ झटकली आहे. पाठोपाठ शिवसेना जिल्हाप्रमुख, नेते आणि आमदार यांच्या बैठका घेऊन एका बाजूला विकास कामांचा आढावा तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. 

हेही वाचा - लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल पाच जणींशी केले लग्न; वीरपत्नींना हेरुन पेन्शन मंजूर करतो म्हणत केली फसवणूक -

शिवसेनेत कमालीचे बदल जाणवू लागले आहेत. कोकणातील शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हापातळीपासून ते गाव पातळीपर्यंत शिवसैनिक ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसत आहे. युवा सेनेचे वरिष्ठ पदाधिकारीही जिल्हा पातळीवर सक्रिय झाले. कोणतीही निवडणूक नसताना पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेणे, जिल्हापरिषद गटात बैठका, भेटीगाठी, समस्यांच्या बाबतीत आवाज उठवणे अशा कार्यक्रमांची रीघ सुरु आहे.  

शिवसेनेवर टीका करण्याची आणि कोंडीत पकडण्याची एक ही संधी भाजप पदाधिकारी सोडत नाहीत. पदाधिकार्‍यांनी तालुकानिहाय दौरे आयोजित करून भेटीगाठींना सुरुवात केली. शिवसेनेच्या नाराज आणि संघटनेपासून लांब असलेल्या पदाधिकार्‍यांच्या भेटींचे आयोजन केले जात आहे. आणि भाजपच्या खेळीला उत्तर देण्यासाठी शिवसेना अ‍ॅक्टिव्ह झाली असल्याची चर्चाही आहे. शिवसेनेत निर्माण झालेला हा उत्साह, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सक्रिय झालेले शिवसैनिक पाहता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा हे उद्धव ठाकरेंचे विधान केंद्रस्थानी धरून चर्चा रंगत आहे.

हेही वाचा -  ना नफा, ना तोटा ; मतलई वाऱ्याचा मच्छीमारीवर परिणाम -

"कोकणातील घराघरात शिवसेना रूजलेली आहे. कोरोनानंतर हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विकास कामे केली जात आहेत. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठीच आम्ही पक्षाचे उपक्रम हाती घेतले आहेत. नव्या पिढीला विधायक राजकारणात आणण्याचे काम आम्ही करत आहोत." 

- योगेश कदम, आमदार दापोली

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to answer the bJP shiv sena is in ground level in ratnagiri