राजापूरमध्ये अर्जुना कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली ; व्यापार्‍यांची उडाली तारांबळ...

राजेंद्र बाईत
Tuesday, 4 August 2020

पूराच्या पाण्यामुळे काही तासामध्ये जवाहर चौक सुमारे पाच फुट पाण्याखाली गेला होता.

राजापूर (रत्नागिरी) : काल रात्रीपासून मुसळधार पडणार्‍या पावसामुळे तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांना आज सकाळी पूर येवून पूराचे पाणी थेट बाजारपेठेमध्ये घुसले. सकाळी काही वेळ मोकळा असलेला जवाहर चौक परिसर   वेगाने वाढणार्‍या पूराच्या पाण्यामुळे काही तासामध्ये सुमारे पाच फुट पाण्याखाली गेला होता.

पावसाच्या जोराबरोबर वाढणार्‍या पूराच्या पाण्याने दुपारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढील भागात धडक दिली. तासागणिक वाढणार्‍या पूराच्या पाण्याने व्यापार्‍यांच्या मनामध्ये चांगलीच धडकी भरली. अशामध्ये दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविताना व्यापार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. यावर्षीच्या पावसामध्ये बाजारपेठेत पूराचे पाणी घुसण्याची आजची पहिलीच वेळ आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातील शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. तर, अर्जुना-कोदवली नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, उन्हाळे आदी गावांमधील भातशेती पाण्याखाली गेली आहे.

हेही वाचा- रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण... -
काल रात्रीपासून तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यातून, पहाटे 3.30 वा. च्या सुमारास जवाहर चौकातील टपर्‍या पाण्याखाली गेल्या . त्यातून, दिवसभरामध्ये पूर येण्याचे संकेत सार्‍यांना मिळाले होते. मात्र, नद्यांच्या पाण्याचा वाढणारा वेग काहीसा संथ होता. मात्र, रात्रभर सुरू असलेली पावसाची रिपरिप आज सकाळपासून कायम होती. त्यातून 11 वा.च्या सुमारास तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. त्यातून आलेल्या पूराच्या पाण्याने जवाहरचौक परिसरासह थेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या वरच्या भागापर्यंत धडक दिली. त्यातच, बाजारपेठेमध्येही पूराचे पाणी घसुले.

हेही वाचा-चिपळूणमध्ये हे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचितच; ग्रामीण भागात या सुविधेचा अभाव.. -

कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथ मार्गावरील टपर्‍या, दुकाने, कोंढेतड आणि वैशपायंन पूल, बंदधक्का आणि वरचीपेठ परिसर पूराच्या पाण्याखाली गेला आहे. पूराचे पाणी वाढण्याचा पूर्वअंदाज आणि अनुभवामुळे व्यापारी आधीच सतर्क झालेले होते. पूरस्थितीचा अंदाज घेवून काहींनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. मात्र, काहींचा माल तसाच दुकानात होता. त्यांची वाढणार्‍या पूराच्या पाण्यामुळे माल हलविताना चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र, सतर्कततेमुळे व्यापार्‍यांचे फारसे नुकसान झालेले नाही. या पूरस्थितीमुळे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.  

हेही वाचा- मंडणगडातील ही पाच धरणे ओव्हर फ्लो... -

गतवर्षीच्या पूरस्थितीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

गतवर्षीही आजच्या (4) दिवशी सततधारा पडणार्‍या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर येवून पूराच्या पाण्याचा शहराला वेढा पडला होता. त्यातच, बाजारपेठेत घुसलेल्या पूराच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वरच्या भागापर्यंत धडक दिली होती. त्यानंतर पुढे काही दिवस पूरस्थिती कायम राहीली होती. गतवर्षीच्या या पूरस्थितीची पुनरावृत्ती यावर्षीही पावसाने केली. काल रात्रीपासून सततधारा पडणार्‍या पावसामुळे नद्यांना पूर येवून पूराच्या पाण्याने शहराला वेढा घातला आहे. त्यातच, पाण्याने छत्रपती शिवाजी पुतळ्याच्यावरच्या भागापर्यंत धडक दिली आहे.  

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjuna Kodavali rivers flooded the market directly in ratnagiri