esakal | येवा कोकण आपलाच असा! मासे खरेदीला पर्यटकांची मांदियाळी
sakal

बोलून बातमी शोधा

येवा कोकण आपलाच असा! मासे खरेदीला पर्यटकांची मांदियाळी

येवा कोकण आपलाच असा! मासे खरेदीला पर्यटकांची मांदियाळी

sakal_logo
By
राधेश लिंगायत

दापोली : कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन उद्योगाला बऱ्यापैकी सुरुवात होत असताना पर्यटकांची आवक हळूहळू सुरू झाली आहे. सरकारने उठवलेल्या बंदीमुळे कित्येक महिने कंटाळलेला पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी  हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे.

थंड अल्लाहदायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशी पर्यंतचा समुद्र किनारा यामुळे दापोलीला पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर एक महत्वाचे स्थान आहे. कोरोनाच प्रमाण त्यामानाने कमी होत असल्याचं दिसून येताच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक फिरायला बाहेर पडू लागला आहे. गेल्या शनिवार रविवार पासून लागलेली सलग सुट्टीच्या निमित्ताने आणि आता गांधी जयंती व लागून रविवार अश्या सलग सुट्टीमुळे शुक्रवारच्या पूर्वसंध्येला पर्यटक हजर झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेला पर्यटक पर्यटनासाठी दापोलीमध्ये येऊ लागला आहे. दापोली तालुक्याची किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल रिसॉर्टमध्ये पर्यटक आवर्जून हजेरी लावू लागले आहेत.

दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णे बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली पण सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. दोन दिवसांपूर्वीच वातावरण शांत झाल्यामुळे मच्छीमार मासेमारीकरिता समुद्रामध्ये जायला लागले आहेत. परंतु रोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी मारून आणत आहेत तीच मासळी विक्रीसाठी बंदरात येत आहे. त्याच मासळीच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. शासनाने बंदी उठवल्यानंतर नियम शिथिल केल्याने पर्यटक खास फिरणं आणि मासळी खरेदीसाठी येऊ लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णे बंदरामधील मासळीच्या वेगवेगळ्या जाती खरेदी व खास आवर्जून खाण्यासाठी येतच असतात

हेही वाचा: खा की खा! मासे खरेदीसाठी हर्णे बंदरावर खवय्यांची तुफान गर्दी

त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटकांची कोकणात यायला सुरुवात झाली आहे . सध्या केळशी, हर्णे, पाजपंढरी येथील छोट्या बोटी डेलीसाठी म्हणजे सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी मासळीविक्रीच्या वेळेवर विक्रीसाठी मासळी घेऊन बंदरात येतात.

अश्या छोट्या बोटींच्या मालावरच सध्या हर्णे बंदरात बाजार चालू आहे. मोठ्या नौकांचा अजूनही लिलाव सुरू झालेला नाही त्यामुळे मुबलक अशी मासळी अजूनही बंदरात येत नाही. या डेलीसाठी जाणाऱ्या छोट्या बोटी मात्र पापलेट, सुरमई, तोवर, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळी घेऊन येत असल्याने येणाऱ्या पर्यटकांची मासळी खाण्याची व्यवस्था होत आहे. येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडतेच; परंतु कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाची लज्जत ही वेगळीच असते.

दापोलीत आलो आणि हर्णे बंदरातली ताजी मासळी खाल्ली नाही असं एकाही पर्यटका कडून होत नाही. इथल्या ताज्या मिळणाऱ्या मासळीचे पर्यटकांना विशेष आकर्षण वाटते. त्यामुळे गेल्या शनिवार पासून मासळी खाण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी पर्यटक हर्णै बंदरामध्ये आवर्जून हजेरी लावू लागले आहेत. सध्या ताजे ताजे मासे चिमणी बाजारातूनच पर्यटक खरेदी करत आहेत. गेल्या शनिवार पासूनच सकाळी व सायंकाळी चिमणी बाजारामध्ये हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांचीच संख्या जास्त दिसत आहे.

loading image
go to top