ट्रॉलर्स मालक संघटनेच्या अध्यक्षपदाचा तोडणकर यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मालवण - गेली आठ वर्षे मी पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो; मात्र आमच्या काही पर्ससीनधारकांनी एलईडीची मासेमारी सुरू केल्याने मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. पर्ससीनधारक ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग लावत आहे का? अशी भावना निर्माण झाल्यानेच संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. श्री. तोडणकर म्हणाले, ‘‘पर्ससीननेटच्या मासेमारीवर शासनाने निर्बंध घातल्यानंतर बारा नॉटीकलच्या बाहेर मासेमारी करणे, पर्ससीनची मासळी येथील बाजारात न आणणे, यासारखी बंधने आम्ही घालून घेतली होती. पर्ससीनधारक मच्छीमार व पारंपरिक मच्छीमार हे दोन्ही मच्छीमार जगले पाहिजेत, अशी आमची भूमिका होती; मात्र यात आमच्या काही लोकांनी ही निर्बंध पाळले नाहीत. पर्ससीननेटबरोबर त्यांनी एलईडीची विध्वंसकारी मासेमारी सुरू केली. हे आपल्याला योग्य वाटले नाही. त्यामुळे सुरवातीस माझा ट्रॉलर विकला. सध्या जिल्ह्यातील किनारपट्टीवरील परिस्थिती पाहता चिंगुळ, लेप यासारखी मासळी तर रापणकर मच्छीमारांना मासळीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रापण संघ, गिलनेट हे व्यवसाय बंद पडत चालले आहेत. 

ते पुढे म्हणाले, एलईडीच्या बेछूट मासेमारीमुळे मत्स्योत्पादन घटत चालले आहे. काही ठराविक लोकच यात मोठे होत असून पारंपरिक मच्छीमारांना ज्या समस्या भेडसावत आहेत. त्याचे त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. संघटनेतील अनेक सदस्यांनी आपला केवळ वापर करून घेतला. दरम्यान, भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच काम करणार आहे. हा राजीनामा देण्यास आपल्यावर कोणाचाही दबाव नाही.

जीवनच धोक्‍यात 
पारंपरिक मच्छीमारांच्या तोंडातील घास हे एलईडी पर्ससीनधारक, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सधारक हिरावून नेत आहेत. अशी परिस्थिती एवढ्या वर्षात जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नव्हती. मच्छीमारांची पुढील पिढी बरबाद होणार आहे. एलईडीच्या जीवघेणी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे जीवनच धोक्‍यात आल्‍याचे तोडणकर म्‍हणाले. 

झालझुल मैदानावर २१ रोजी मेळावा
दांडी येथे २१ रोजी सकल मच्छीमार मेळावा होत आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या आवाहनानुसार दांडीतील झालझुल मैदानावर खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून सकल मच्छीमार समाज हायस्पीड, एलईडी पर्ससीन व परराज्यातील मच्छीमारांच्या विरोधात संघर्षाची हाक देणार असे श्री. तोडणकर यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Todankar resigns Trollers Owners Association president post