esakal | प्रेरणादायी ! अपयशातील चुका हेरून तिसऱ्या मुलाखतीत मिळवले यश 
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin Golapkar Success In UPSC Exam Ratnagiri Marathi News

अश्‍विन सांगतो, क्‍लास नव्हता पण टेक्‍स्ट सिरीज, प्रश्‍नोत्तरे, विषयानुसार गाइडन्स घेतला. खोली घेऊन एकटाच राहिलो, खानावळीत जेवलो पण 10 तासांचा अभ्यास चुकला नाही. उत्तरे लिहायचा सराव केला. 

प्रेरणादायी ! अपयशातील चुका हेरून तिसऱ्या मुलाखतीत मिळवले यश 

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - दिल्लीत 2015 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. दुसऱ्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत धडक मारली; पण तिसऱ्या परीक्षेत मुलाखतीतील चुका हेरून जास्त मेहनत घेतली. दिल्लीत स्पर्धा परीक्षांचे पूरक वातावरण, नियमित 10 ते 12 तासांचा अभ्यास, वृत्तपत्र वाचन, लेखनाचा सराव आणि मुलाखतीचे तंत्र अवगत केल्यानेच यश मिळाले. आमच्या घराण्यात देशसेवेत जाणारा मी पहिलाच, अशी प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत 773वी रॅंक मिळवणाऱ्या अश्‍विन गोळपकर याने "सकाळ'शी बोलताना दिली. 

दोन दिवसांपूर्वी अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अश्‍विनने 2015 मध्ये दादरला लक्ष्य ऍकॅडमीमध्ये कोर्स केला. 2016 ला पहिल्या परीक्षेत यश मिळाले नाही. मग चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी 2017 मध्ये दिल्ली गाठली. दुसऱ्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत धडक मारली. 2019 ला तिसरी परीक्षा दिली आणि अंतिम मुलाखतीत यश मिळवले.

अश्‍विन सांगतो, क्‍लास नव्हता पण टेक्‍स्ट सिरीज, प्रश्‍नोत्तरे, विषयानुसार गाइडन्स घेतला. खोली घेऊन एकटाच राहिलो, खानावळीत जेवलो पण 10 तासांचा अभ्यास चुकला नाही. उत्तरे लिहायचा सराव केला. 

या निकालानंतर आजी-आजोबा आणि आई राखी, वडिल राजन यांना अत्यानंद झाला. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. अश्‍विनचे मूळ घर गोळपला (ता. रत्नागिरी). तो म्हणाला, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त माझे आजोबा पावस विद्यामंदिरमध्ये शिक्षक होते. लहानपणी ते इतिहासाच्या गोष्टी सांगत. त्यातून इतिहासाची आवड निर्माण झाली. आवडीमुळे वैकल्पिक विषय इतिहास घेतला. शासकीय सेवेत जाण्यास वडिलांनी प्रोत्साहन दिले. 

अश्‍विनचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर व फाटक हायस्कूलमध्ये झाले. चौथी व सातवीची शिष्यवृत्ती, नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेतही त्याने यश मिळवले. बोपर्डीकर, टिकेकर, जोशी आदी शिक्षकांनी स्पर्धा परीक्षांतून देशसेवेची संधी मनावर बिंबवली. पुढे ठाण्याच्या एसईएस ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी, वाशीच्या फादर ऍग्नेल कॉलेजमध्ये बीई (इलेक्‍ट्रिकल) आणि इंदोर आयआयएममधून एमबीए पदवी मिळवून एक वर्ष कॉर्पोरेट जॉब केला. 

तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे 

रत्नागिरीत स्पर्धा परीक्षांचे वातावरण तयार करण्यासाठी शाळांमध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे. यातून देशाची सेवा करायला मिळते व करिअर होते. उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे या परीक्षांचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. रत्नागिरीकर तरुणांनी जास्तीत जास्त याकडे वळले पाहिजे, असे आवाहन अश्‍विनने केले. 

loading image