गतवर्षीच्या समस्येचे पुन्हा डोके वर, असनियेवासीयांत धास्ती

महेश चव्हाण
रविवार, 12 जुलै 2020

चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता तात्पुरता मोकळा करण्यात आला; परंतु त्यानंतर कायम स्वरूपी उपाययोजनांची तजवीज मात्र शासनाकडून झाली नाही. वारंवार डोंगराची माती ढासळण्याचे प्रकार घडत असून घारपीवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

ओटवणे (सिंधुदुर्ग) - सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढू लागल्याने असनिये-घारपी रस्त्यावर पुन्हा डोंगराच्या कडा ढासळू लागल्या आहेत. गतवर्षी भूउत्खनन झालेल्या या डोंगराच्या कडा ढासळू लागल्याने येथील जनसामान्यांमध्ये भीती आहे. 

असनिये कणेवाडी घारपी असा रस्ता पुढे जातो; मात्र या कणेवाडी रस्त्यालगतची मोठी डोंगराळ कडा पुन्हा घसरू लागल्याने गतवर्षीची समस्या पुन्हा डोके वर काढू लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत या ठिकाणी भूउत्खनन झाल्याने कणेवाडीतील तसेच घारपीवासीयांना स्थलांतरित व्हावे लागले होते. भीतीने पूर्ण घरांना शाळेचा आसरा घ्यावा लागला होता.

अशा भयानक परिस्थितीत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे याखेरीज सर्वच लोकप्रतिनिधीनी भेटी दिल्या खऱ्या मात्र दिलेली आश्‍वासने हवेतच विरली. चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता तात्पुरता मोकळा करण्यात आला; परंतु त्यानंतर कायम स्वरूपी उपाययोजनांची तजवीज मात्र शासनाकडून झाली नाही. वारंवार डोंगराची माती ढासळण्याचे प्रकार घडत असून घारपीवासीयांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

प्रशासकीय ताळमेळ नाही 
असनिये घारपी हा रस्ता मूळचा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून हा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल 4 कोटी रुपये खर्चून तयार केला होता. हा रस्ता देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे आवश्‍यक होते; परंतु तो वर्ग न केल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग यावर खर्च करू शकत नाही तर पंतप्रधान ग्रामसडक विभागाचा कार्यकाळ संपल्याने दुरुस्तीसाठी निधी खर्ची करता येत नाही; मात्र या दोन्ही विभागांचा चालढकलपणा व प्रशासकीय ताळमेळ नसल्याने दुर्गम भागातील असनिये, घारपीवासीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भूउत्खनन झालेल्या डोंगराळ भागात त्वरित उपाययोजना अंमलात न आणल्यास पुन्हा एकदा येथील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार की काय? अशीच भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asniye mountain dangerous konkan sindhudurg