आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

रत्नागिरी जिल्ह्यात ‘अ’ श्रेणी मिळवलेली तीन कॉलेज एकत्र करून कस्टर विद्यापीठाची निर्मिती करण्यावर आमचा भर राहणार आहे. हे स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकते. यासाठी ५५ कोटी मिळू शकतात.
- सदानंद भागवत

साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

यूजीसीच्या उच्चाधिकार समितीने महाविद्यालयाची सक्षमता, आधुनिक पायाभूत सुविधा, प्रबंधनाची सशक्तता आणि महाविद्यालयाला मिळालेली नॅकची अ श्रेणी, विद्यापीठाचा मिळालेला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे जाणीव जागरांचा पुरस्कार या सर्व बाबींचा विचार करून यूजीसीने ही स्वायत्तता बहाल केली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी स्वायत्ततेबाबत बोलताना महाविद्यालयाचे कामकाज मुंबई विद्यापीठांतर्गत यूजीसीच्या नियमानुसारच होणार आहे असे स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक समितीवर डॉ. व्यकंट रामण्णा, प्राचार्य सिद्धेश्वर गडदे, डॉ. अतुल साळुंखे यांची निवड केल्याचे तेंडोलकर यांनी सांगितले. 

समितीवर १६ तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक केली आहे. देशभरातील सुमारे ४० हजार महाविद्यालयांमध्ये ६५० महाविद्यालये स्वायत्त आहेत. मुंबई विद्यापीठातील सुमारे ८०० महाविद्यालयांपैकी देवरूख महाविद्यालय हे २१ वे महाविद्यालय स्वायत्त झाले आहे, हे विशेष असल्याचे तेंडोलकर यांनी नमूद केले.

स्वायत्तता मिळाल्यानंतर कोकणभूमीशी संबंधित अभ्यासक्रम तयार करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आता विचार होणार आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष मदन मोडक, पांडुरंग भिडे, भावना जोशी, सचिव शिरीष फाटक उपस्थित होते.

अभ्यासक्रम बनविण्याचे स्वातंत्र्य
कोकण परिसराची भौगोलिक परिस्थिती, नोकरी व्यवसायातील भविष्याच्या गरजा, कौशल्य विकासाला प्राधान्य यासारख्या अनेक विद्यार्थीहिताच्या महत्त्वाच्या मुद्यांवर महाविद्यालयाला अभ्यासक्रम बनवण्याचे स्वातंत्र्य यामुळे मिळाले आहे. या माध्यमातून विद्यार्थी विकास व समाज विकास साधण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाल्याचे भागवत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Athale Sapre PItre college autonomous by UGC