एक रुपयांत एक लीटर शुद्ध पाणी ; पिण्याच्या पाण्याचे एटीएम, पाचल ग्रामपंचायतीचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ATM water start in pachal ratnagiri one rupee one liter water

पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करणारी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे.    

एक रुपयांत एक लीटर शुद्ध पाणी ; पिण्याच्या पाण्याचे एटीएम, पाचल ग्रामपंचायतीचा उपक्रम

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पाचल ग्रामपंचायतीच्यावतीने लोकांना कमी पैशामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करण्यात येणार आहे. एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातून, ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा हक्काचा स्रोतही निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करणारी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे.    

सरपंच अपेक्षा मासये आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये सुमारे ३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या एटीएमसाठी जि. प.चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविलेल्या स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या रक्कमेतून खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय इमारत आवार आणि पाचल हायस्कूलच्या आवारामध्ये एटीएम सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - कोकणात सभापतिपदासाठी सेनेचे दावेदार; पाचजण संधीच्या रडारवर

येत्या महिना-दीड महिन्यामध्ये हे एटीएम कार्यान्वित होण्याचा विश्‍वास पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी व्यक्त केला. तालुक्‍याच्या पूर्व भागातील सुमारे चाळीस गावांचे पाचल हे मध्यवर्ती ठिकाण आहे. कोरोना महामारीमध्ये पाचल गावासह परिसरातील गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलताना पाचल ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पाचल येथे मोठी बाजारपेठ असून बॅंकिंग, वैद्यकीय आणि शैक्षणिक आदी विविध सुविधाही या ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकांची नियमित वर्दळ असते. बाजारपेठेसह विविध कामानिमित्ताने येणाऱ्या लोकांसह शाळकरी मुले मिळून सुमारे दहा हजार लोक दिवसभरामध्ये या ठिकाणी येतात. अनेकांना पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी १० ते २० रुपयांचा भुर्दंड पडतो. ही बाब लक्षात घेऊन शुद्ध पिण्याच्या पाण्याची दोन एटीएम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नारकर यांनी दिली.

"पाचल गावातील लोकांसह पंचक्रोशीतील गावांमधून येणाऱ्या लोकांना कमी पैशामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत एटीएम सुरू करणार आहे."

- अर्जुन नागरगोजे, ग्रामविकास अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

Web Title: Atm Water Start Pachal Ratnagiri One Rupee One Liter Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..