सिंधुदुर्गात होणार नवीन १८ हवामान केंद्रांची उभारणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

जिल्ह्यात हवामान केंद्र व त्यांचे स्थान या हवामान केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांची संख्या किलोमीटरप्रमाणे निश्‍चित करण्यात येईल.

ओरोस : फळ पीक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी राज्यस्तरावर कृषिमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊ, तसेच जिल्ह्यामध्ये नवीन निर्माण झालेल्या १८ महसुली मंडळांमध्ये हवामान केंद्र उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देऊ, असे आश्‍वासन मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या बैठक सभागृहात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना २०२०-२१ करीता बदल केलेल्या निकषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.

हेही वाचा - काळा तांदुळ फुलवणार पैशांचा मळा -

सामंत म्हणाले, ‘‘फळ पीक विमा योजनेमध्ये केलेले बदल हे राज्याचे नसून केंद्राने केलेले बदल आहेत. या विमा योजनेमध्ये असलेल्या अटींमध्ये बदल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय होणे आवश्‍यक आहे. यासाठी राज्यस्तरावर कृषिमंत्री व जिल्ह्यातील फळ उत्पादक बागायतदार तसेच आंबा उत्पादक यांच्या प्रतिनिधींशी मुंबई मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा होईल.’’
ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील फळ उत्पादक विशेषत: आंबा उत्पादक यांना विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हवामान केंद्राचा अहवाल महत्वाचा आहे.

त्यासाठी जिल्ह्यात नवीन १८ हवामान केंद्रे तातडीने उभी करण्यात येतील. ही हवामान केंद्रे उभी करताना सर्वंकष बाबींचा विचार करण्यात येईल. यापुढील काळात हवामान केंद्र उभे करण्यासाठी जिल्ह्यातील आंबा उत्पादक व तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालानुसारच जिल्ह्यात हवामान केंद्र व त्यांचे स्थान या हवामान केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांची संख्या किलोमीटरप्रमाणे निश्‍चित करण्यात येईल.’’

हेही वाचा -  स्थानिक राज्यकर्ते अजूनही शेतकर्‍यांच्या बांधावर पोचले नाहीत ; नीलेश राणे

"जिल्ह्यामध्ये नवीन १८ महसूल मंडळे निर्माण केली आहेत. या महसूल मंडळांमध्ये हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणे सुलभ होईल. जिल्ह्यातील हवामान केंद्रे सदोष राहतील, यासाठी कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करावी. जी हवामान केंद्रे नादुरुस्त आहेत किंवा ज्यांची किरकोळ दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे, ती तातडीने करावीत. यासाठी नेमण्यात आलेल्या हैद्राबाद येथील एजन्सीला तातडीने कळवावे. या एजन्सीची एक व्यक्ती कायमस्वरुपी या जिल्ह्यात राहील व हवामान केंद्राची देखभाल दुरुस्ती करेल, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे."

- उदय सामंत, 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atmosphere centre are start in sindhudurg said mr. uday smanat in sindhudurg its use for farmers also