स्थानिक राज्यकर्ते अजूनही शेतकर्‍यांच्या बांधावर पोचले नाहीत ; नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचा आहे म्हणून तिथे मेडिकल कॉलेजची घोषणा केली.

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीसाठी आस लावून बसले आहेत. त्यांचे अश्रू पुसायला कोणीच आलेले नाही. काही गावात अधिकारीच पोचलेले नाहीत. यावरुन स्थानिक राज्यकर्ते शेतकर्‍यांबाबत किती गंभीर आहे, ते दिसून येते. मंत्री, आमदार, खासदार अजूनही शेतकर्‍यांच्या बांधावर पोचले नाहीत, असा आरोप भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केला. येथील रायगड निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पुढे बोलताना राणे म्हणाले, पावसामुळे नुकसान झालेल्या हरचिरी, निवळीसह काही गावांची भाजप पदाधिकार्‍यांसह पाहणी केली. तालुक्यातील 30 ते 40 टक्के पंचनामे अजून शिल्लक आहेत. भातशेती बाजूला ठेवून शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत आहेत. कृषीचा एखादाच अधिकारी बांधावर पोचतो. उर्वरित कामे धिम्या गतीने सुरू आहेत. स्थानिक राज्यकर्त्यांनी पंचनामे करून घेण्याचीही दक्षताच घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कोकणाकडे पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्री सोलापूरला गेले तिथे 3,700 रुपयांचा धनादेश देऊन आले. ही चेष्टाच आहे. त्या शेतकर्‍याने धनादेश माघारी पाठवला. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना अजूनही अनेकांना पैसे मिळालेले नाहीत. सरकारविरोधी बोलणार्‍या पत्रकाराविरोधात केस लढवायला दहा लाख रुपये देऊन वकील केला जातो, पण शेतकर्‍यांना पुरेश भरपाई द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. पंचनामेच झाले नसल्याने शेतकर्‍यांच्या हाती काहीच आलेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचा आहे म्हणून तिथे मेडिकल कॉलेजची घोषणा केली. पण रत्नागिरीसाठी फक्त आश्‍वासनच दिले गेले. एनएमसीची परवानगी घेतल्याशिवाय कॉलेज होत नाही; मात्र त्यापूर्वीच कॉलेजची घोषणा झाली. राजकारण आणि पोकळ घोषणा याशिवाय काहीच नाही. रत्नागिरीचे आमदार सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत, ते फक्त पर्यटनाला येतात. रत्नागिरी तालुक्यात एवढे नुकसान होऊनही ते बांधावर गेलेच नाहीत, अशी टीका राणे यांनी आमदार सामंतांवर केली.

राज्य सरकारने नेमलेला वकिल न्यायालयात उपस्थित राहत नाहीत. तारखांवर तारखा पडत राहील्या तर मराठा समाजातील तरुणांची अवस्था बिकट होईल. तस झालं तर सरकारचे काहीच खर नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाचे नियोजन कसे असते मागील वेळी सर्वांनीच पाहीलं आहे. मराठा रस्त्यावर उतरले तर सरकारला पळायला लावेल. लवकरच निर्णय घ्या अन्यथा तिव्र आंदोलन करायला भाग पाडू नका. सध्या या समाजातील तरुण त्रस्त झालेला आहे. सरकारकडून त्यात भर टाकू नये. 
नाणार रिफायनरीसाठीच्या जागांची चौकशी होणार आहे. एक महिन्याच्या आत त्याचा अहवाल विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मागितला आहे. अजुन वीस दिवस शिल्लक आहेत. सध्या चौकशी सुरु आहे की नाही याबाबत मी जास्त विचार करत नाही. महिना पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. या चौकशीत अनेक शिवसैनिकच सापडणार आहेत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तिवरे धरण फुटीला जबाबदार असलेल्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात न्यायलयात जायची आमची तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे पण वाचालेखणीत रमणारे हात राबले शेतात अन् कष्टाने फुलविलेले सृजनाचे मळे ; थक्क करणारा 'तिचा' प्रेरणादायी प्रवास 

33 किमीसाठी चाळीस लाखाचा खर्च

मुंबई न सोडणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरला  गेले. तिथेही एका कोपर्‍यात जाऊन शेतकर्‍यांना भेटले आणि मुंबईला परत गेले. 33 किमी अंतरावर असलेल्या गावाला भेट देण्यासाठी दुसर्‍या दिवशी पुन्हा आले. यामध्ये चाळीस लाखाचा खर्च झाला. मुंबई सोडून कुठेच राहायला तयार नसलेले मुख्यमंत्री एकमेव आहेत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticism on local leadership