कुटुंबाने सोडून दिलेल्या बालिकेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

रत्नागिरी - एका कुटुंबाच्या निष्काळजीपणाची ८ वर्षाची मुलगी बळी ठरली आहे. कुटुंबाने वाऱ्यावर सोडल्यामुळे ही मुलगी एका नराधमाची शिकार बनली. काल रात्री शहरातील शिवाजी स्टेडियम येथे हा प्रकार घडला. संशयिताला चाईल्डलाईन संस्थेच्या मदतीने शहर पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरी - एका कुटुंबाच्या निष्काळजीपणाची ८ वर्षाची मुलगी बळी ठरली आहे. कुटुंबाने वाऱ्यावर सोडल्यामुळे ही मुलगी एका नराधमाची शिकार बनली. काल रात्री शहरातील शिवाजी स्टेडियम येथे हा प्रकार घडला. संशयिताला चाईल्डलाईन संस्थेच्या मदतीने शहर पोलिसांनी अटक केली.

चाईल्डलाईन संस्था आणि शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एक नागरिक शतपावलीसाठी काल रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी स्टेडियमकडे गेला होता. तेव्हा एक प्रौढ व्यक्ती ८ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. अतिशय गंभीर आणि घृणास्पद घटना असल्याने लहान मुलांसाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन या संस्थेच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर त्यांनी संपर्क साधला. या घटनेची माहिती त्यांना दिली. 

संस्थेचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी गेले. मुलीने घडलेला प्रकार सांगितला. चाईल्डलाईनमार्फत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित आरोपी विकास विठ्ठल पवार (वय ३५, रा. मेरवी) ला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत लेखी तक्रार दाखल करून बलात्काराच्या गुन्ह्याखाली संशयितास अटक केली.

पॉक्‍सोंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. एका कुटुंबापासून दुरावेलली ही चिमुरडी आहे. रत्नागिरीतील युवकाने 
एका महिलेशी विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून ३ मुले होती. पण त्या युवकाने ३ मुलांचा स्वीकार केला नाही. घरातील लोकांपासून ही गोष्ट लपवली. अखेर त्या तीन मुलांना शिवाजी स्टेडियम येथे निर्जनस्थळी सोडून देण्यात आले होते. मुलांच्या निराधारपणाचा फायदा घेऊन संशयित विकास पवार या मद्यपी नराधमाने ८ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on the child abandoned by the family