एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ला करून एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 May 2019

एक नजर

  • दोडामार्ग तालुक्‍यातील वझरे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर एका युवकाचा चाकूने हल्ला.
  • हल्ला झालेली मुलगी अत्यवस्थ
  • मृत युवकाचे नाव गोकुळदास रावजी काळकेकर (वय २५, रा. वझरे- काळकेकरवाडी). 

दोडामार्ग - तालुक्‍यातील वझरे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर एका युवकाने चाकूने सपासप वार केले. त्या युवकाने स्वतःही आत्महत्या केली. हल्ला झालेली मुलगी अत्यवस्थ आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गोवा बांबोळी येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. मृत युवकाचे नाव गोकुळदास रावजी काळकेकर (वय २५, रा. वझरे- काळकेकरवाडी) असे आहे. 

संबंधित मुलगी घरासमोरील विहिरीवर दुपारी चारच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला. संबंधित मुलीच्या आईने विहिरीजवळच रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या आपल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले. घटनास्थळावरून आणि मुलीच्या पालकांकडून मिळालेली माहिती अशी : संबंधित मुलगी कुटुंबातील सर्वात मोठी आहे. तिने नवनीनंतर शाळा सोडली होती.  अलीकडे ती एका काजू कारखान्यात कामाला जायची. गोकुळदास वझरेतील ग्लोबल कोकमध्ये कामाला जायचा. वर्षभरापूर्वी गोकुळदासने संबंधित मुलीला पळवून नेले होते. त्याबाबत पोलिस ठाण्यातत तक्रारही झाली होती. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला वडिलांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर वर्षभर कोणताही प्रकार घडला नव्हता. 

मिळालेल्या माहितीनुसार अलीकडे संबंधित मुलगी गोकुळदासला भेटण्याचे टाळत होती; मात्र त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम कायम होते. गोकुळदास दुपारी चारच्या दरम्यान दोडामार्ग मार्गाने वझरेकडे जात असताना त्याला संबंधित मुलगी विहिरीवर जाताना दिसली. त्याने दुचाकी बाजूच्या घराजवळ लावली आणि तो विहिरीवर गेला. तेथे दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी त्याने आपल्याकडील स्वयंपाकघरात वापरली जाणारी सुरी घेऊन तिच्यावर सपासप वार केले. तिच्या डाव्या हातावर दोन, पोटावर पाच तर छातीत खोलवर एक वार झाला. ती जाग्यावर कोसळली. त्यानंतर त्याने स्वतःला चाकूने भोसकून घेतले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित मुलीला तिच्या आईने प्रथम गावातील खासगी दवाखान्यात नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार झाले. जखमा गंभीर असल्याने तिला तातडीने गोव्याला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.       

एक गरीब कुटुंब हादरले!
संबंधित मुलीचे कुटुंब गरीब आहे. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्यामुळे संबंधित मुलीने शाळा सोडून मजुरीला जाण्याला प्राधान्य दिले होते.

अन्य गुन्ह्यातही गोकुळदास
गावात शांतता, तसेच गावात घडलेली घटना हृदयद्रावक असली तरी अनपेक्षित होती. विहिरीजवळ गोकुळदासचा मृतदेह बराचवेळ पडून होता. गावकरी माहिती द्यायलाही कचरत होते. काही दिवसांपूर्वी वझरेत टॉवरवरून दोन गटात मारामारी आणि हल्ला झाला होता. त्यातील एका गटात गोकुळदासच्या नावाची नोंदही पोलिस दप्तरी आहे.

हातात सुरी तशीच
गोकुळदासने आपल्या पोटात सुरी भोसकून आत्महत्या केली; ती सुरी त्याच्या मृत्यूनंतर उजव्या हाताच्या मुठीत वाकलेल्या स्थितीत होती. त्याच्या तोंडातून हिरवा स्राव आल्याने त्याने विष प्यायल्याची शक्‍यता व्यक्त होत होती, पण डॉ. जाधव यांनी तपासणीनंतरच ते कळेल, असे सांगून रक्तप्रवाह बंद झाल्यावर शरीर निळे पडते, त्यातील तो प्रकार असावा, अशी शक्‍यता व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on minor girl and then suicide incidence in Dodamarg