सिंधुदुर्ग : फोंडाघाट बाजारात चोरीचा प्रयत्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येथील बाजारपेठेतील तावडे यांचे चोरट्यांनी फोडलेले किराणा दुकान.

सिंधुदुर्ग : फोंडाघाट बाजारात चोरीचा प्रयत्‍न

कणकवली - तालुक्‍यातील फोंडाघाट बाजारपेठेत आज पहाटे साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी तीन दुकाने फोडली; मात्र दुकानात रोकड नसल्‍याने तेथीलच अजित नाडकर्णी यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्‍न केला. तेथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे तेथून पसार झाले. दरम्‍यान, फोंडाघाटात पोलिस गस्त नसल्‍याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्‍त केली. जिल्ह्यात वैभववाडी आणि तळेरे बाजारपेठेत चोरट्यांनी डल्‍ला मारल्‍यानंतर आज पहाटे फोंडाघाट बाजारपेठेत चोरीचा प्रयत्‍न केला. यात बाजारपेठेतील केदार कोल्ड्रिंक्स आणि प्रदीप तावडे यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी फोडले; मात्र या दुकानामध्ये रोकड नसल्‍याने चोरट्यांच्या हाती काही गवसले नाही. यानंतर या चोरट्यांनी बाजारपेठेतील अजित नाडकर्णी यांचे बंद घर फोडण्याचा प्रयत्‍न केला. दरवाचा कडी कोयंडा तोडला जात असताना त्‍याचा आवाज तेथील शेजारी महेश पेडणेकर यांनी ऐकला. त्‍यांनी तातडीने याबाबतची माहिती लगतच्या रहिवाशांना दिली. यात चाहूल लागल्‍याने चोरटे तेथून पसार झाले.

या घटनेची माहिती तातडीने कणकवली पोलिसांना देण्यात आली. तर काही वेळेत पेट्रोलिंगवर असलेले पोलिस उपनिरीक्षक बापू खरात फोंडाघाट बाजारपेठेत हजर झाले. त्‍यांनी स्थानिकांच्या साहाय्याने चोरटे पसार झालेल्‍या भागात शोधण्याचा प्रयत्‍न केला; मात्र चोरटे आढळून आले नाहीत. चोरट्यांच्या हालचाली बाजारपेठेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्‍या आहेत. दोन ते तीन जणांची ही टोळी असण्याची शक्‍यता स्थानिकांनी व्यक्‍त केली. तसेच तळेरे आणि वैभववाडी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी व्यक्‍ती आणि फोंडाघाट बाजारपेठेतील सीसीटीव्हीमध्ये आढळलेल्‍या व्यक्‍तींमध्येही साम्‍य आढळले आहे. त्‍यामुळे आता चोरट्यांच्या या टोळीचा शोध घेणे पोलिसांना आव्हान ठरणार आहे.

दुकानांमध्ये रक्कम न ठेवण्याचे आवाहन

दरम्‍यान, फोंडाघाट बाजारपेठेत चोरीचा प्रयत्‍न झालेल्‍या केदार कोल्ड्रिंक्स आणि श्री. तावडे यांच्या शटरचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दुकानामध्ये रोख रक्‍कम न ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये रोकड ठेवणे बंद केले आहे. त्‍यामुळे या चोरी प्रकरणात चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही.

टॅग्स :SindhudurgcrimeSawantwadi