नागरिकांमधील जागृतीने संसर्ग होतोय कमी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती झाली आहे. आपल्या हातातच आपली सुरक्षा असल्याचे कोरोनाने शिकवले आहे. थोडी जरी लक्षणे आढळली तरी स्वतःहून नागरिक तपासणी करून घेत आहेत. आम्ही चाचण्या वाढवल्यामुळे जिल्ह्यात संसर्ग रोखण्यात आपल्याला यश आले आहे; मात्र अजूनही 10 टक्के लोक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांचा शोध सुरू आहे; मात्र फैलाव कमी झाल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. 

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फैलाव वाढला. समूह संसर्ग सुरू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानामध्ये सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरअखेर जिल्ह्यात सुमारे 9 हजाराच्या दरम्यान बाधित रुग्ण वाढण्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज होता. सुदैवाने ते प्रमाण कमी झाले आहे. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात एका दिवसात 217 च्या वर रुग्ण सापडत होते. मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा नियमित वापर अनिवार्य असल्याचे लोकांच्या लक्षात आले. यापूर्वी लक्षणं असली तरी नागरिक भीतीने उपचारासाठी दाखल होत नव्हते. त्यामुळे संसर्ग आणि मृत्यूदर वाढत गेला. तपासणी करून वेळेवर उपचार घेतल्यास कोरोनावर मात करता येते, हे लक्षात आले. थोडी जरी लक्षणे दिसली तरी ते आपली टेस्ट करून घेऊ लागले. स्वतःहून नागरिक पुढे येऊ लागले. आम्ही टेस्टिंग वाढवले, संशयितांना शोधून काढले. त्यामुळे संसर्ग रोखण्यात यश आले. अजूनही 10 टक्के लोक लक्षणे लपवून ठेवत आहेत. ते धोकादायक आहे. लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून पुढील उपचार घ्या, तरच आपण कोरोनावर मात करू शकतो, असे डॉ. फुले यांनी सांगितले. 

हे पण वाचा - रस्त्यावर थुंकणं पडलं तरुणाला हजार रुपयाला

 
तपासणीसह वेळेवर उपचाराने घडला बदल 
टेस्टिंग वाढवले, संशयितांना शोधले 
10 टक्के लोक लक्षणे लपवतात, ते धोकादायक 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness among the citizens is less contagious