राणेंचा भाजप प्रवेश केसरकरांच्या जादूमुळेच रखडला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. अशा मतभेदांना वैचारिक पद्धतीनेच उत्तर द्यायचे असते; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांचे राजकारण हे जादूवर चालते.

- बबन साळगावकर

सावंतवाडी - आपण विधानसभेसाठी इच्छुक असून मी निवडणूक लढविणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांसोबत माझे बोलणे झाले असून तशी इच्छाही आपण व्यक्‍त केली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा केसरकरांच्या जादूमुळे होऊ शकत नाही, असेही नगराध्यक्ष साळगावकर यांनी या वेळी सांगितले.  

राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. अशा मतभेदांना वैचारिक पद्धतीनेच उत्तर द्यायचे असते; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांचे राजकारण हे जादूवर चालते.

- बबन साळगावकर

साळगावकर म्हणाले, केसरकरांनी चार ऑगस्टला मैत्री दिनी घेतलेली भेट ही एक षड्‌यंत्र होत, त्या भेटीनंतर माझ्यावर झालेल्या वारातून जखम झाली नसली तरी त्याचे भोग आजही मी भोगत आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्याचा दुसरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे. 

नगराध्यक्ष बबन साळगावकर व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात निर्माण झालेली दरी आज अधिकच रूंदावली. श्री. साळगावकर यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांच्यावर टीका केली. या वेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आंनद नेवगी उपस्थित होते.

साळगावकर म्हणाले, ""केसरकर यांनी घेतलेली भेट ही आश्‍चर्यकारक होती. त्यावेळी हॉटेल रत्नेशच्या बाहेर नेहमीच्या ठिकाणी बसलो होतो. त्या ठिकाणी आलेल्या केसरकर यांनी मला तेथून रूममध्ये नेले व काहीही न बोलता ते काही वेळात तेथून निघून गेले. मी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलू दिले नाही; मात्र तेव्हापासून आतापर्यंत अनेक भोग भोगावे लागले आहेत; मात्र केसरकर यांच्या अशा जादूला घाबरणार नसून त्यांचा दुसरा चेहरा जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यांच्या जादूमध्ये वादळ निर्माण करण्याची ताकद असून लोकसभेत भोसले उद्यानात माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेली चूक ही केसरकर यांच्याच जादूची किमया होती.'' 

ते म्हणाले, ""केसरकर नगराध्यक्ष होताना अल्पमतात असताना माझ्यासह निता भाईडकर व उमेश कोरगावकर यांनी त्यांना पाठिंबा दिला नसता तर आज त्यांचे राजकीय करिअरच उभे राहू शकले नसते. त्यावेळी त्यांना राजकीय ताकद दिली; मात्र जिल्ह्यात दहशतवाद आहे, असे भासवून केसरकर पुढे आमदार झाले. त्यावेळी माझ्यासह सगळेच कार्यकर्ते त्याच्यासोबत ठामपणे राहीले; पंरतु त्यांच्याकडून अपेक्षिक विकास झाला नाही. रस्ते करणे हे केसरकरांचे काम नसून आज भातुकलीच्या खेळातली उद्‌घाटने ते करत आहेत. गेल्या पाच वर्षांत अपेक्षित विकास केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. साध्या कामासाठीही त्यांनी आम्हाला निधीची भीक मागायला लावली.'' 

श्री. साळगावर म्हणाले, ""केसरकर सत्तेत राहण्यासाठी कुठल्याही खालच्या पातळीवर जाऊ शकतात. एका बाजूने भाऊ म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूने वार करायचा ही केसरकरांची वृत्ती आहे; मात्र प्रत्येक गोष्टीचा अंत असतो. त्यांची जादू नेहमी चालणार नसून माझ्याकडील असलेल्या डायरीत आत्तापर्यतचा प्रत्येक घटनाक्रम मी लिहिला आहे. तो घटनाक्रम येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर मांडणार असून मी घाबणार नाही. तर लढत राहणार, माझे तोंड कोणीच बंद करू शकत नाही.'' 

""अलीकडेच केसरकर यांनी पालिकेत घेतलेल्या व्यापारी बैठकीत हस्तक्षेप केला. त्याठिकाणी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी शहरातील सुरू असलेल्या अमली पदार्थांमुळे युवा पिढी कशी बरबाद होते, याची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा आवाज दाबला तर दुसरीकडे या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला झापत वृत्त वाहिनी बंद करण्याची धमकी दिली. हा प्रकार म्हणजे दहशतवाद नाही का? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमची वाट बघत असून हिच जनता केसरकरांचा पराभव करणार आहे.'' 

- बबन साळगावकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baban Salgaonkar comment on Minister Deepak Kesarkar