सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी साळगावकर यांचाही अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

गेले कित्येक दिवस राजकारणापासून अलिप्त असलेल्या साळगावकरांनी आज कोणाच्या ध्यानीमनी नसताना अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले. मुळात राष्ट्रवादी पक्षाकडून पुंडलिक दळवी यांचे नाव चर्चेत असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या साळगावकरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी पुन्हा एकदा बबन साळगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दोनच महिन्यांपूर्वी नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडत राजीनामा दिल्याने हे निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवीत निवडणूक लढविणाऱ्या साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी येत्या २९ ला पोटनिवडणूक होत आहे.

गेले कित्येक दिवस राजकारणापासून अलिप्त असलेल्या साळगावकरांनी आज कोणाच्या ध्यानीमनी नसताना अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सर्वांनी आश्‍चर्य व्यक्त केले. मुळात राष्ट्रवादी पक्षाकडून पुंडलिक दळवी यांचे नाव चर्चेत असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या साळगावकरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. साळगावकर हे गेली तीन वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांची थेट जनतेतून निवड झाली होती. या आणि त्या आधीच्या कारकिर्दीत शहरात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांना मानणारा वेगळा गटही शहरात आहे. त्यामुळे ते उमेदवारी कायम ठेवणात की मागे घेतात हे पाहणे आता औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

हेही वाचा - सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून यांचा अर्ज 

राष्ट्रवादी सांगतील तो निर्णय मान्य

अलीकडे दीपक केसरकर यांनी श्री. साळगावकर यांच्याशी आपण वेगळी चर्चा करणार असे स्पष्ट केले होते. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राष्ट्रवादी जो काय निर्णय घेईल तो साळगावकर यांना मान्य असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर साळगावकर यांनी आज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा - नीलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर हाच मुद्दा आणणार पण आम्ही... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baban Salgaonkar Fill Form As Independent In Sawantwadi Election