esakal | कासवाच्या गावातून हजारों पिल्ले समुद्राकडे झेपावली...

बोलून बातमी शोधा

 the baby turtles flew from the velas sea beach

वेळास किनारा; २२ घरट्यातून १०९० पिल्लं बाहेर; नैसर्गिक घरट्यातून ८१ पिल्लांचा जन्म

कासवाच्या गावातून हजारों पिल्ले समुद्राकडे झेपावली...

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड - कासवांचे गाव अशी ओळख मिळालेल्या वेळास समुद्रकिनाऱ्यावरून यावर्षात आतापर्यंत १०९० कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली. त्यात संरक्षित करण्यात आलेल्या किनाऱ्यावरील एका नैसर्गिक घरट्यातून ८१ पिल्ले बाहेर येत अथांग समुद्रात गडब् झाली. किनाऱ्यावरील हॅचेरीत २२ घरट्यातून सापडलेली २७१५ अंडी सुरक्षित करण्यात आली होती. अजून एका घरट्यातील पिल्लं बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे फॉरेस्ट ऑफिसर श्री.भोसले यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासव महोत्सव स्थगित केल्याने पर्यटकांना समुद्राच्या पाण्याकडे धाव घेणाऱ्या छोट्या पिल्लांचा निसर्गोत्सव सोहळा अनुभवता आला नाही. कासवमित्र वीरेंद्र पाटील व देवेंद्र पाटील यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनात कासवांच्या पिल्लांना सुरक्षितरीत्या समुद्रात सोडले. २००२ पासून वेळास किनाऱ्यावरून हजारों कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील शेवटचं टोक म्हणजे वेळास! तीन बाजूने डोंगरांनी वेढलेल्या आणि एक चतुर्थांश भागात समुद्र किनाऱ्याने वेढलेले हे गाव आपल्या कुशीत अनेक ऐतिहासिक गुपित लपवून बसले आहे. ऐतिहासिक हिमतगड किल्ल्याच्या बाजूला बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे गाव. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले वेळास काही दशकांपुर्वी फारसे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. असे असले तरी गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर आले ते तिथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांमुळेच. आज वेळासची ओळख ' कासवांचे गाव ' अशीच झाली आहे. कोकणच्या अनेक किनाऱ्यावर समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम चालू आहे. कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूत अंडी घालते. परंतु काही प्राणी हि अंडी काढून खातात. नशिबाने काही पिल्ले बाहेर आली तर ती समुद्रापर्यंत पोहचता-पोहचता पक्षांची शिकार होतात. जी समुद्रात पोहचतात ती पिल्ले आणि कासव मच्च्छीमारांच्या जाळ्यात अडकून मरण पावतात. मादी साधारणतः १२०-१५० इतकी अंडी घालते. समुद्राच्या भरतीच्या रेषेत न येणारी जागा योग्य समजली जाते. ४५-५५ दिवसांनी त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर ती समुद्रात सोडली जातात. संरक्षित केलेल्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ता.३ मार्च पासून त्याची सुरवातही झाली होती. देश विदेशातून पर्यटक कासव महोत्सवाला यायला सुरू झाले होते. मात्र दरम्यान कोरोना महारोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने केंद्र व राज्य शासनाकडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. वेळास येथील कासव महोत्सवावर कोरोना आजाराचे संकट उभे ठाकले. जगभरातून येणाऱ्या पर्यटक यामुळे वेळास ग्रामपंचायतमध्ये ता.१२ मार्च रोजी ग्रामसभेने हा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला.

वाचा - कोरोनाच्या थैमानात 'भारतीय' शिक्का हजारो किलोमीटरवरही रक्षणकर्ता...

अंडी शोधून कासव मित्रांकरवी हचेरीत सुरक्षित
 

नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम कासव मित्रांनी केले. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत ही घरटी शोधण्यात आली. घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्यासह घरट्यातल्या अंड्याची नोंद करण्यात आल्यानंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात म्हणजे किनाऱ्यावरील हचेरीत आणून सुरक्षित करण्यात आली होती. तिथे पुन्हा तेवढ्याचा खोलीचा खड्डा करुन त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली. अंडी पुरल्यानंतर त्या खड्यावर घरटे सापडले तो दिवस आणि तारीख नोंद करण्यात आली होती.

सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने सुरू केले प्रथम संवर्धन
 

दशकभरापुर्वी ही कासवं आणि त्यांची घरटी याबद्दल फारशी माहिती कोणाला नव्हती. किनाऱ्यावर फिरताना अधेमधे ही कासवं त्यांना दिसायची. पण त्याला फारसे महत्व कधी दिले नाही. कासवांचे महत्व, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशासाठी करायला हवे याबाबतची पुरेशी जाण त्यांना नव्हती. मानवी शिकारांच्या तावडीतून सुटलेली अंडी आणि कासवे नंतर अन्नसाखळतील कोल्हे, कुत्रे, समुद्री पक्षी, जाळे यांच्या तावडीत सापडत. काही नशीबवान पिल्ले अंड्यातून सुखरुप बाहेर येऊन पाण्यापर्यंत पोचत त्यांच्यामधल्या दीर्घायुषी होण्याचे भाग्य हजारामधील एखाद्याच पिल्लाला मिळत असे. वेळास किनारी मोठ्या प्रमाणात कासवे प्रजाननासाठी नियमीतपणे येतात याची सर्वप्रथम नोंद घेतली ती चिपळूणच्या सह्याद्री नेचर कन्झ्रेवेशन या संस्थेने. वर्ष २००२ पासून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने या कासवांच्या संवर्धनासाठी संघटित स्वरुपात आणि शास्त्रीय पध्दतीने काम सुरु केले. या संस्थेचे कार्यकर्ते, वेळासचे गावकरी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वेळास कासव संवर्धनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.