बांद्यात रस्त्याला मोठे भगदाड 

निलेश मोरजकर
Thursday, 29 October 2020

सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष गुरू सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्‍यामसुंदर मांजरेकर यांनी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी झाडांच्या फांद्या टाकून अडथळा निर्माण केला आहे.

बांदा (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावर शहरातील कट्टा कॉर्नर चौकाजवळ रस्त्यात मधोमध भलेमोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महामार्ग विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन भगदाड बुजवावे अशी मागणी होत आहे. सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष गुरू सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्‍यामसुंदर मांजरेकर यांनी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी झाडांच्या फांद्या टाकून अडथळा निर्माण केला आहे.

तसेच याची कल्पना पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून बॅरिकेट्‌स उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी अतिवृष्टीचा फटका महामार्गाला बसला आहे. महामार्ग ठिकठिकाणी खचण्याच्या घटना घडल्या आहेत. येथील कट्टा कॉर्नर सर्कल जवळ महामार्गावर मातीचा भराव खचल्याने भगदाड पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे भगदाड दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. 

भागदाडामुळे पडलेल्या खड्ड्याची खोली जास्त असल्याने दुचाकी खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता आहे. महामार्गावर खामदेव नाका व सटमटवाडी येथेही रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून ते अपघातांना निमंत्रण देत आहेत. खामदेव नाका येथे दुचाकी खड्ड्यात जाऊन युवती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. तर सटमट येथे खड्ड्यात पडून तोरसे जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ हे देखील गंभीर जखमी झाले होते. 

नाराजी व्यक्त 
आतापर्यंत याठिकाणी अपघात होऊन कित्येकजण जायबंदी झाले आहेत. वेळोवेळी लक्ष वेधुनही महामार्ग विभागाने खड्डे न बुजविल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी खड्डा दिसत नसल्याने खड्ड्यात अपघात होऊन वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लवकरात लवकर महामार्गावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी खान व राऊळ यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad road in banda sindhudurg district