रस्ता की खाचखळगे? वाहनचालक त्रस्त, आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

सध्या मुसळधार पावसामुळे याच खड्ड्यांत पाणी साचून अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक करीत आहेत. 

नांदगाव (सिंधुदुर्ग) - कासार्डे गडमठमार्गे फोंडा मार्गावर कासार्डे तिठा ते दाबवाडी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मुसळधार पावसामुळे याच खड्ड्यांत पाणी साचून अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक करीत आहेत. 

तळेरेपासून सुरू होणारा कासार्डे गडमठमार्गे फोंडा मार्ग अनेक वर्षे खड्ड्यांसाठीच प्रसिद्ध आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाची डागडुजी करते; मात्र ती डागडुजी तकलादू असल्याने नेहमीच या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते. वेळोवेळी याबद्दल निवेदन देवूनही आजही या मार्गाची तीच अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, अवजड वाहतूक व संबंधित विभागाचे दुर्लक्ष यामुळे ही परीस्थिती उद्भवली आहे.

तत्पूर्वी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी मागील काही महिन्यापूर्वी ठिय्या आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. यावेळी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या झालेल्या चर्चेत अवजड वाहने जात असल्याने या मार्गावर त्या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन रस्ता काम मजबुतीकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. या मार्गावर डागडुजीही करण्याचे आदेश दिले होते; मात्र यानंतर कोणतेही काम झालेले नसून याबाबत पाठपुरावाही केलेला नाही. परिणामी आजही या रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत आहेत. 

अन्यथा रास्ता रोको 
या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, सोसायटी, अनेक वाड्या आहेत तरी यांना यातूनच प्रवास करावा लागत आहे. या मार्गाच्या कामाबाबत अधिकारी गंभीर नसून पदाधिकाऱ्यांनीही विषय लागून न धरल्याने आजची ही परिस्थिती उद्भवली आहे. तरी येत्या काही दिवसांत हे खड्डे डांबरीकराणाने किंवा सिमेट कॉंक्रीटने बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत असून अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad road kasarde konkan sindhudurg