esakal | मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्या उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्या उद्घाटन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सावंतवाडी: येथील पालिकेच्या जिमखाना मैदान येथील बाळासाहेब ठाकरे प्रबोधनी केंद्राच्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्या (ता.१२) मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

हेही वाचा: राजकारणात पुन्हा सक्रिय होणार; कुणबी मेळाव्यात गीतेंची मोठी घोषणा

दुपारी ३ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठे भतग सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नारायण राणे, खासदार, विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगांवकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सन्माननीय उपस्थितीसह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्रा. कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आणि सिंधुदुर्ग उपपरिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे उपपरिसराची स्थापना करण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

नुकतेच मुंबई विद्यापीठाने संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे कला, नाट्य क्षेत्रातील अभिनयाचा शास्त्रशुद्ध व्यायवसायिक अभ्यासक्रम म्हणून अभिनय कौशल्य पदविका हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे या सर्व गुणधर्मांना उत्पादक परिणामात रुपांतरीत करण्याच्या दृष्टिने या उपपरिसराचे महत्व अधोरेखित होणार आहे.

ब्ल्यू टूरिझम, एग्रो बेस्ड प्रोसेंसिंग युनिट्स, कॉयर अँड बांबून आधारीत इंडस्ट्रीज, फिशरीज, फलोत्पादन, अपारंपरिक कृषी उत्पादने, फूड टेक्नॉलॉजी, फ्रूट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, वाईनरी टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात विपूल संधी निर्माण होऊ शकतात. या अशा संशोधन आणि उद्योन्मुख क्षेत्रातील पदवीधरांचा व्यवसाय सुनिनिश्चित करण्याबरोबरच रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

त्याचबरोबर आजीवन शिक्षण आणि इतर विस्तार उपक्रमांसह विद्यापीठ आंतरविद्याशाखीय उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून येथे कोकणातील विपूल साधन सामुग्रीला उपयुक्त, कौशल्याधारीत आणि अःव्यावसायाभिमूख प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.

त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे करिअर इन्स्टीट्यूट आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरु केले न जाणार आहेत असे उपकुलसचिव तथा जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण पार्श्वभूमी, तेथील सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या उपपरिसरामध्ये दर्जेदार, कौशल्याधारीत आणि व्यावसायाभिमूख शैक्षणिक अभ्यासक्रम त्याचबरोबर उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल टाकले आहे."

"सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावनोंदणीचे प्रमाण (जीईआर) वाढविण्यासाठी तसेच नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विद्यापीठाचे ध्येय आणि उद्दिष्ट्ये, या प्रदेशाची सामाजिक- आर्थिक ऊंची वाढविण्यासाठी त्याचबरोबर त्याची समाजिक प्रासंगिकता लक्षात घेऊन या उप परिसराची स्थापना करण्यात येत आहे"- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

loading image
go to top