मोपा विमानतळाचा मार्ग मोकळा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ban On Mopa Airport Work Removed Sindhudurg Marathi News

आता प्रत्यक्ष कामाला दहा दिवसात सुरुवात करणार असल्याचे हा प्रकल्प साकारत असलेल्या जीएमआर कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

मोपा विमानतळाचा मार्ग मोकळा 

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - मोपा (गोवा) येथील विमानतळाच्या कामास असलेली बंदी आठ महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. पर्यावरणाविषयी अटी घालून याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे विमानतळ प्रत्यक्षात साकारल्यानंतर सिंधुदुर्गालाही याचा फायदा होणार आहे. 

आता प्रत्यक्ष कामाला दहा दिवसात सुरुवात करणार असल्याचे हा प्रकल्प साकारत असलेल्या जीएमआर कंपनीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच पर्यावरणविषयक घातलेल्या सर्व अटींची पूर्तता करण्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतर्फे आता या कामावर देखरेख ठेवली जाणार आहे. सुमारे 2200 एकर जागेवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेनजीक पेडणे तालुक्‍यात हा विमानतळ उभारला जात आहे. त्यामुळे गोव्याइतकेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही अर्थकारण भविष्यात बदलणार असल्याने गोव्यासोबत सिंधुदुर्गवासीयांचेही न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते.

हेही वाचा - राजापूर तालुक्यात या गावांच्या मे मध्ये निवडणूका 

न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पहील्या टप्प्यात दोन ऐवजी 3800 मीटर लांबीची एकच धावपट्टी उभारली जाणार आहे. गोवा सरकार विमानतळाला राजधानी पणजी, फोंडा व मडगाव शहराना महामार्गाद्वारे जोडणार आहे. विमानतळ ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जोडणारा स्वंतत्र सहापदरी महामार्गही बांधला जाणार आहे. संबंधित कंपनीच्या ताब्यात सध्या दिल्ली, हैदराबाद व फिलिपाइन्स मधील सेबू विमानतळ आहेत तर गोवा व ग्रीस येथील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावीत आहेत. सध्या वापरात असलेला वास्को विमानतळ हा नौदलाच्या मालकीचा असल्याने त्याच्या विस्तार व वापरावर निर्बंध आहेत. देशातील सर्वात व्यस्त विमानतळात दहाव्या क्रमांकावर असलेल्या गोवा विमानतळावरुन गत वर्षात 84 लाख प्रवाशानी ये जा केली. पुढील दोन वर्षात ही संख्या 1 कोटी पार करेल; परंतू अपुऱ्या जागेमुळे भविष्यात वाढणारी वाहतूक हाताळण्यासाठी गोव्याला मोपा विमानतळ आवश्‍यक होता. मोपा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागुन असल्याने विशेष करुन दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील पर्यटन तसेच उद्योगधंद्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. 

हेही वाचा - शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे घरात घुसले अन्... 

टॅग्स :SindhudurgGoa