बांदा-ओटवणे कालव्यात यंदा लवकर पाणी

निलेश मोरजकर
Tuesday, 12 January 2021

सध्या 1400 लिटर प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले असून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे तिलारी कालवा विभागाचे स्थापत्य अभियंता संदीप राणे यांनी "सकाळ'ला सांगितले.

बांदा (सिंधुदुर्ग) - गोव्यातून बांदा-ओटवणेपर्यंत जाणाऱ्या 33 किलोमीटर लांबीच्या तिलारीच्या शाखा कालव्यातून यंदा लवकर पाणी सोडण्यात आले. येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. 4 दिवसांपूर्वी गोवा सीमेवरील नेतर्डे-हाळी गेटवरून पाणी सोडण्यात आले. 
कालव्यात वाफोली येथे पाणी पोहोचले आहे. सध्या 1400 लिटर प्रति सेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले असून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे तिलारी कालवा विभागाचे स्थापत्य अभियंता संदीप राणे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

यावर्षी येथील परिसरात टंचाईची शक्‍यता लक्षात घेता डिसेंबरातच कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी येथील सरपंच अक्रम खान यांनी तिलारी कालवा विभागाकडे पाठपुरावा केला होता. 

येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर हे सातत्याने कालव्यातून पाणी सोडण्याबाबत आग्रही होते. त्यासाठी कल्याणकार व दाभोलकर हे तिलारी कालवा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात होते. गेली सहा वर्षे या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहर व परिसरातील गावांमधील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. 

दरवर्षी कालवा विभागाकडून कालव्याची साफसफाई पावसाच्या तोंडावर करण्यात येत असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत होता. कालव्याची साफसफाई करण्यात येत नसल्याने कालव्यात सोडण्यात आलेले पाणी हे अस्वच्छ होत आहे. यावर्षी संपूर्ण कालव्याची साफसफाई करण्यात आली नसल्याने पाण्याचा वेग हा कमी आहे. काही ठिकाणी कालव्यात मोठ्या प्रमाणात जंगली झाडांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा वेग हा मंदावला आहे. ओटवणे येथे कालवा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने यावर्षी ओटवणेवासीयांना कालव्याचे पाणी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. कालव्याची साफसफाई करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. 

आठ दिवसांचा कालावधी 
कालव्यातील अंतर्गत सफसफाईची कामे पूर्ण न करताच सिंधुदुर्ग-गोवा राज्यांच्या सीमेवरील नेतर्डे-हाळी येथील गेटवरून कालव्यात पाणी सोडले आहे. हा कालवा डिंगणे, सटमटवाडी, नेतर्डे, बांदा येथून ओटवणेपर्यंत जातो. या कालव्याची लांबी 33 किलोमीटर असल्याने ओटवणेपर्यंत पाणी जाण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे अभियंता राणे यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banda-otwane canal water konkan sindhudurg