esakal | अज्ञातांकडून मुख्य रस्त्यालगत लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय बनले | Banner
sakal

बोलून बातमी शोधा

Banner

अज्ञातांकडून मुख्य रस्त्यालगत लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय बनले

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण - तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्‍न सध्या ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांप्रश्‍नी वाहनधारकांबरोबरच पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच सध्या तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांच्या परिसरात अज्ञातांकडून लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. ‘78 कोटीचो आकडो पेपरातच दिसलो, रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो’ यासारखे उपरोधिक टोला लगावणारे बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

तालुक्यातील कांदळगाव येथील रस्त्यावरही काही दिवसांपूर्वी असे बॅनर लावण्यात आले होते. तारकर्ली- देवबाग येथील रस्त्यावरही असे बॅनर लावण्यात आले होते. मात्र काहींनी हे बॅनर फाडून टाकले होते. तालुक्यातील खड्ड्यांचा प्रश्‍न गेली बरीच वर्षे न सुटल्याने लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्वसामान्यामधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तारकर्ली, देवबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गावांमध्ये पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

हेही वाचा: फिल्मीस्टाईलने २३ लाख रूपये लुटून आरोपी झाले फरार

मात्र या रस्त्यावर वायरी भुतनाथ ते तारकर्ली- देवबागकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खड्डेमय रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत सातत्याने लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याने सर्वसामान्यांकडून याबाबत विविध पद्धतीने नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे.

सध्या वायरी- भुतनाथ, तारकर्ली, देवबाग या मुख्य रस्त्यालगत ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर सर्वांच्याच चर्चेचा विषय बनले आहेत. यात ‘समर्थक कडवे असावे पण हजार वेळा खड्ड्यात पडले तरी आपल्या साहेबांना समर्थन देणारे नसावे’, ‘एक फाडलात 10 लावणार पण मालवण-तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यांच वैभव दाखवतच राहणार’, ‘तारकर्ली एक पर्यटन गाव?? की तारकर्ली एक खड्डेमय गाव??’, ‘ बॅनर फाडा किंवा जाळा पण या खड्ड्यातून जाताना तोंड करा काळा’ यासारखे उपरोधिक टोला लगावणारे बॅनर अज्ञातांकडून लावण्यात आले आहेत.

loading image
go to top